मुंबईत रंगणार 'महाबली' शेराच्या 'इम्पॅक्ट' रेसलिंगचा थरार!

 Goregaon
मुंबईत रंगणार 'महाबली' शेराच्या 'इम्पॅक्ट' रेसलिंगचा थरार!

'इम्पॅक्ट रेसलिंग'चे केवळ अमेरिकेतच नव्हे, देशभरातही मोठ्या संख्येने चाहते आहेत. मुंबईत पहिल्यांदाच या रेसलिंगचे आयोजन करण्यात येत असून या रेसलिंगमध्ये बलदंड अमेरिकन रेसलर्सला पाणी पाजणारा भारतीय रेसलर 'महाबली शेरा' देखील सहभागी होणार आहे. मंगळवारी गोरेगावच्या फिल्मसिटी येथे होणाऱ्या या रेसलिंगमध्ये शेरा आपला दम दाखवणार आहे.
मुंबईच्या फिल्मसिटीमध्ये 'इम्पॅक्ट रेसलिंग'च्या मॅचेस होणार आहेत. या रेसलिंगमध्ये खेळणारे सर्वच महत्त्वाचे खेळाडूही मुंबईत दाखल झालेले आहेत. मॅचसाठी अमेरिकेत लावण्यात येतो तसा सेट आणि रिंग देखील उभारण्यात आलेली आहे.
मुंबईत पहिल्यांदाच रेसलिंग खेळण्यासाठी उत्सुक असलेल्या महाबली शेराने 'मुंबई लाइव्ह'शी संवाद साधताना सांगितले की, मुंबईत रेसलिंग खेळण्याचे माझे देखील स्वप्न होते. माझ्या मायदेशातल्या लोकांपुढे मला खेळायची संधी मिळत असल्याने मी खूप खूष आहे. माझ्या चाहत्यांसाठीही ही आनंदाची गोष्ट असेल. या शोसाठी मी इतका उत्सुक आहे की मागील 15 दिवसांपासून मला नीट झोपही लागलेली नाही. फक्त व्यायाम आणि जेवण याकडेच मी माझे लक्ष केंद्रीत केलेले आहे.
सुरुवात कबड्डीने -
या क्षेत्रात येईन असे मला वाटले नव्हते. सुरूवातील मी कबड्डी खेळायचो. त्यानंतर मी शरीरसौष्ठव स्पर्धेत सहभाग घ्यायला सुरुवात केली आणि नंतर 'इम्पॅक्ट रेसलिंग' हा शो साईन केला, असे शेराने सांगितले.


पहा काय म्हणतोय महाबली शेरा भारताबद्दल आणि भारतीयांच्या रेसलिंग प्रेमाबद्दल


दररोज खातो 25 ते 30 अंडी आणि चिकन -
फिटनेस आणि आहाराची माहिती देताना शेराने सांगितले की, मी दररोज किमान 2 तास व्यायाम करतो. कारण व्यायामामुळेच आपले आरोग्य नीट राहते. कार्यक्षम राहण्यासाठी स्टॅमिना वाढवणेही खूप महत्त्वाचे आहे. माझ्या आहारात मी दररोज 25 ते 30 अंडी खातो. त्याशिवाय मीठ आणि मिरची यांचा वापर न केलेले केवळ शिजवलेले चिकनही खातो.

'डब्ल्यूडब्ल्यूई' आणि 'इम्पॅक्ट रेसलिंग'मधला फरक

'डब्ल्यूडब्ल्यूई' आणि 'इम्पॅक्ट रेसलिंग' यात फरक आहे. 'डब्ल्यूडब्ल्यूई'मधील फाईट खोटी असते, तर 'इम्पॅक्ट रेसलिंग'मध्ये खरी फाईट दाखवली जाते. त्यामुळेच चाहते आम्हाला 'डब्ल्यूडब्ल्यूई'पेक्षा 'इम्पॅक्ट रेसलिंग' बघायला खूप आवडते, असे सांगतात.

रेसलिंग फक्त गेममध्येच खेळा, घरात नाही -
लहान मुलांचा स्टाईल आयकॉन असलेल्या महाबली शेराने आपला लूक बदलला असून लांब केस आणि बिअर्डने तो आणखी डॅशिंग दिसत आहे.
याबद्दल शेरा म्हणाला, मी माझा लूक नुकताच बदलला आहे. दाढी मला चांगली दिसत असल्याने मी दाढी ठेवली आहे आणि केसही वाढवले आहेत. त्यामुळे काही चाहते मला बाहुबली म्हणून हाक मारत आहेत. पण मी कुणाची नक्कल केलेली नाही. तरूण आणि मुलांनी मला लूकमध्ये फॉलो केले, तरी चालेल. परंतु रेसलिंग करताना कुणीही घरात वा बाहेर आमचे अनुकरण करू नये. कारण आम्ही त्यासाठी खूप मेहनत घेत असतो. आमच्या प्रत्येक मॅच अथक सरावानंतर आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच खेळवल्या जातात. तिथे आरोग्याचीही काळजी घेतली जाते. तेव्हा लहान मुलांना खेळ खेळायचेच असतील, तर मैदानी खेळ खेळावेत किंवा व्हीडिओ गेमवर रेसलिंग खेळावी.

Loading Comments