SHARE

चर्चगेट - येथील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात सोमवारी इंग्लंडच्या युवा संघाने यजमान भारत युवा संघाचा 23 धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. डावखुरा फलंदाज रॉलिन्सने 88 चेंडूत 5 षटकार आणि 8 चौकारांसह नाबाद 107 धावा झळकविल्या.

19 वर्षांखालील वयोगटाच्या या दोन संघांमध्ये ही वनडे मालिका आयोजित केली आहे. सोमवारच्या पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. इंग्लंडने 50 षटकांत 7 बाद 256 धावा जमविल्यानंतर भारताचा डाव 42.5 षटकांत 233 धावांत आटोपला.

भारताच्या अचूक गोलंदाजीसमोर इंग्लंड युवा संघाची 32 व्या षटकात 6 बाद 126 अशी केविलवाणी स्थिती होती पण रॉलिन्स आणि फिशर या जोडीने संघाचा डाव सावरताना सातव्या गडय़ासाठी 116 धावांची भागिदारी केल्याने इंग्लंडला 250 धावांचा टप्पा गाठता आला.

भारतीय संघात हिमांशू राणेने 101 धावा करत चांगली सुरुवात केली. पण या सामन्यात डावाच्या मध्यावर इंग्लंडच्या गोलंदाजांनी अवघ्या 23 धावात सर्व भारतीय फलंदाजांना चीत केले. स्किपर फिशर याने 41 धावात 4 गडी बाद करत इंग्लंडच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या