Advertisement

जग जिंकणारा दादरचा आयर्नमॅन!


SHARES

4 किलोमीटर स्विमिंग...180 किलोमीटर सायकलिंग..आणि तब्बल 42 किलोमीटर रनिंग...आणि हे सर्व कुठेही न थांबता एकाच दमात! अशक्य..हे सर्व ऐकल्यावर हा एकच शब्द तुम्हाला आठवेल! पण कदाचित पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सर्वात कठीण स्पर्धांपैकी ही एक स्पर्धा असेल. आयर्नमॅन...स्विमिंग, रनिंग आणि सायकलिंग या तीन प्रकारांमध्ये स्पर्धकांच्या क्षमतांचा कस लागणारी स्पर्धा. या स्पर्धेची सुरुवात अमेरिकेत झाली.

आता तुम्ही म्हणाल की जगभरात होणाऱ्या या स्पर्धेची इथे चर्चा का? कारण अतिशय कठीण वाटणारी ही स्पर्धा सर केलीये एका मुंबईकर माणसाने! मुंबईच्या दादरमध्ये लहानाचा मोठा झालेला हेमेंद्र चोणकरने 2015मध्ये लुईविलमध्ये झालेली आयर्नमॅन स्पर्धा सर केली. कसा घडला एक मुंबईकर आयर्नमॅन? आणि कसा होता त्याचा हा प्रवास?


अमेरिकेत माझ्या शेजारी एक व्यक्ती रहातात. हवाईतील कोना या ठिकाणी होणारी आयर्नमॅन वर्ल्ड चॅम्पियनशिप त्यांनी तब्बल 7 वेळा पूर्ण केली आहे. पण नंतर मला कळलं की या सात चॅम्पियनशिप त्यांनी फक्त एका किडनीवर पूर्ण केल्या आहेत. काही वर्षांपूर्वी एका अॅक्सिडेंटमध्ये त्यांची एक किडनी फेल झाली होती. मात्र त्यावर हार न मानता त्यांनी जिद्दीने या आयर्नमॅन पूर्ण केल्या. तेव्हा मी ठरवलं, की जर एका किडनीवर ते सात वेळा आयर्नमॅन पूर्ण करु शकतात, तर आपण का नाही?

हेमेंद्र चोणकर, विजेता, आयर्नमॅन 2015

दादरच्या बालमोहन शाळेत शिकलेल्या हेमेंद्रने रुपारेल कॉलेमधून पुढचं शिक्षण घेतलं. त्यानंतर आयुष्याच्या वेगवेगळ्या वाटा धुंडाळत शेवटी करिअर घडवताना तो थेट अमेरिकेत जाऊन पोहोचला. मात्र या सगळ्या प्रवासात त्याच्यातला अॅथलिट कायम जिवंत होता. त्याचं ते पॅशनच होतं म्हणा! म्हणूनच तो सांगतो की तब्बल 10 वर्ष तो आयर्नमॅनसाठी तयारी करत होता!


सर्वात आधी मी स्प्रिंट ट्राएथलॉन केली. 400 मीटर स्विमिंग, 27.3 किलोमीटर सायकलिंग आणि 5 किलोमीटर रनिंग. त्यातून आत्मविश्वास वाढला आणि ऑलिम्पिक साईज ट्राएथलॉनमध्ये सहभागी व्हायचा निर्णय घेतला. 14.5 किलोमीटर स्विमिंग, 51.5 किलोमीटर सायकलिंग आणि 10 किलोमीटर रनिंग. त्यानंतर हाफ आयर्नमॅन केली, आणि शेवटी मग ठरवलंच. आता मुख्य आयर्नमॅन करायची. 2015 मध्ये लुईविलमध्ये झालेली आयर्नमॅन मग मी सर केली.

हेमेंद्र चोणकर, विजेता, आयर्नमॅन 2015

स्विमिंग, रनिंग, सायकलिंग या प्रकारांमध्ये तर हेमेंद्रचा हातखंडा आहेच. पण त्यासोबतच डाऊन हिल स्किइंग, स्कुबा डायविंग, रॉक क्लाइंबिंग, व्हाईट वॉटर राफ्टिंग, कायाकिंग अशा अनेक अॅथलिट प्रकारांचीही हेमेंद्रला आवड आहे. या सगळ्याबद्दलचं त्याचं पॅशन एवढं, की वेळ मिळाला नाही तर तो थेट घरातच प्रॅक्टिस करतो. साधा टीव्ही सुद्धा तो रिकामा न बघता सायकलिंग करत बघतो! ऑफिस आणि इतर जबाबदाऱ्यांमधून मिळणारा थोडासा वेळ का होईना, पण त्यातही तो त्याचं पॅशन जपतो. कदाचित कायम ट्रेनच्या, बसच्या, ऑफिसच्या किंवा घड्याळाच्या काट्यामागे धावणाऱ्या मुंबईकरांसाठी हेमेंद्रचं वेळापत्रक आदर्श असंच ठरावं.


आपण बिझी शेड्युलचं नेहमी कारण देतो. पण वेळ काढला तर वेळ नक्की निघतो. तुम्ही तुमचं काम आणि इतर गोष्टी सांभाळूनसुद्धा व्यायाम किंवा फिटनेस सांभाळू शकता. विशेषत: मुंबईत अनेक घरांमध्ये दिवस 10 वाजता सुरु होतो. माझं विचाराल तर सकाळी 4 ते 10 वाजेपर्यंतचा वेळ आपण सहज फिटनेससाठी वापरु शकतो.

हेमेंद्र चोणकर, विजेता, आयर्नमॅन 2015



काय आहे आयर्नमॅन स्पर्धा?

रनिंग, स्विमिंग आणि सायकलिंग या तीन प्रकारांना एकत्र आणण्याची कल्पना सर्वप्रथम 1977साली पुढे आली. होनोलुलुमधील नौदलात काम करणारं जोडपं, जुडी आणि जॉन कोलिन्स यांनी हुवाईमध्ये हे तीन प्रकार एकाच स्पर्धेत एकत्र आणण्याचा प्रस्ताव मांडला. आणि तिन्ही प्रकार एकत्र असलेली स्पर्धेची पहिली सुधारीत आवृत्ती 18 फेब्रुवारी 1978 रोजी वायकाई इथे पार पडली. 1981मध्ये वायकाईमधून स्पर्धेचं ठिकाण हुवाईमधल्या कोना इथे हलवण्यात आलं. तेव्हापासून ही स्पर्धा नियमित भरवली जाते.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा

http://eu.ironman.com/triathlon/events/americas/ironman/world-championship.aspx#/axzz4mWkmXwgo


दादरमध्ये रहाणारा सामान्य मुंबईकर...आणि लुईविलमध्ये जिंकलेला आयर्नमॅन! हेमेंद्रचा हा प्रवास काही साधा-सरळ नव्हता. प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्याने हे यश मिळवलं. तसा प्रत्येकामध्येच कोणता ना कोणता स्पार्क असतोच. पण त्याला जोड द्यावी लागते ती जिद्द आणि खडतर प्रयत्नांची. दादरच्या आयर्नमॅनच्या याच जिद्दीला मुंबई लाइव्हचा सलाम!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा