Advertisement

मुंबईकर विक्रमवीर सिद्धांतला जिंकायचंय ऑलिम्पिक मेडल!


मुंबईकर विक्रमवीर सिद्धांतला जिंकायचंय ऑलिम्पिक मेडल!
SHARES

त्याची सुरुवात खरंतर झाली ती फुटबॉलपासून. लहानपणापासून त्याला फुटबॉलचीच आवड. त्यामुळे दुसऱ्या कुठल्या खेळाचा तो विचारच करू शकत नव्हता. पण एक दिवस शाळेच्या मैदानावर एका खेळाडूला हर्डलिंगची प्रॅक्टिस करताना त्यानं पाहिलं आणि त्याच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली!

मुंबईतल्या अंधेरीमध्ये रहाणाऱ्या सिद्धांत थिंगालयाने नुकताच अमेरिकेत झालेल्या अल्टिस इन्विटेशनल हर्डलिंग स्पर्धेमध्ये विक्रम प्रस्थापित केला आहे. 110 मीटरची ही हर्डलिंग रेस सिद्धांतनं अवघ्या 13.48 सेकंदामध्ये पूर्ण केली. आणि आता पुढच्या ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी मेडल जिंकण्याचा त्याचा इरादा आहे!



11व्या वर्षापासून सुरुवात...

आजपर्यंत सिद्धांतने हर्डलिंगमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. पण यामध्ये त्याचा कोणीही मार्गदर्शक नव्हता. लहानपणापासूनच त्याला धावणे, उंच उडीसारख्या क्रिडा प्रकारांमध्ये रस होता. वयाच्या 11व्या वर्षीच अॅथलिट म्हणून त्याच्या करिअरला सुरुवात झाली. पुढे 2008मध्ये कोचीमध्ये झालेल्या आंतर विद्यापीठ (Inter-University) हर्डलिंग स्पर्धेमध्ये त्याने पहिलं पदक मिळवलं आणि त्याच्या यशस्वी वाटचालीला सुरुवात झाली.


लखनौमध्ये पहिलं मेडल!

2009साली लखनौमध्ये झालेल्या नवव्या नॅशनल फेडरेशन कप ज्युनिअर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 110 मीटरसाठी 14.69 सेकंद इतकी वेळ नोंदवून सिद्धांतने कांस्यपदक पटकावलं. पण आता त्याचं लक्ष्य आहे 2020मध्ये टोकियोला होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी मेडल जिंकून आणणं. त्यासाठी त्याने तयारीला सुरुवातही केली आहे. पुढच्या प्रशिक्षणासाठी सिद्धांत अमेरिकेला जाणार आहे. माजी अमेरिकन फुटबॉलपटू डेसीस जॅकसन आणि जॉन रॉस यांच्याकडून तो प्रशिक्षण घेणार आहे. याआधी या दोघांनी नायजेरियाचा ओलुटोयीन ऑग्सट्स आणि बेल्जियमचा केननेथ मेडवूड यांना प्रशिक्षण दिले आहे.



सिद्धांतने आत्तापर्यंत हर्डलिंगमधले अनेक राष्ट्रीय विक्रम आपल्या नावावर केले आहेत. शिवाय हर्डलिंगमधला जागतिक विक्रम तोडण्याचा आपला मानस असल्याचं त्यानं 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितलं.

13.48 सेकंद हा माझाच रेकॉर्ड मोडण्याचा माझा प्रयत्न आहे. या खेळासाठी फिट रहाणं फार आवश्यक आहे. तुमचं 99 टक्के लक्ष हे खेळाकडे असायला हवं, तर उरलेलं 1 टक्का लक्ष हे आरोग्यावर.

सिद्धांत थिंगालया, हर्डलिंग खेळाडू


सिद्धांतने आत्तापर्यंत केलेले विक्रम

  • 2013 - एशियन अॅथलेटिक्स ग्रॅंड प्रीक्स सीरीज लेग 3, कोलंबो - 110 मीटर- 13.81 सेकंद
  • 2014 - कॉमवेल्थ गेम्स, गॅल्सगो - 110 मीटर - 13.91 सेकंद
  • 2016 - कॅनयॉन स्टेट गेम्स, एरिझोना - 110 मीटर- 13.54 सेकंद
  • 2017 - एलटिस इनव्हिटेशनल, एरिझोना - 110 मीटर - 13.48 सेकंद
  • 2017 - यूडब्ल्यू इंदौर प्रीव्ह्यू, सीटल - 60 मीटर - 7.70 सेकंद



भारतासाठी ऑलिम्पिकचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या या मुंबईकराला 'मुंबई लाइव्ह'च्या शुभेच्छा!



हेही वाचा

मुंबईत रंगणार ब्लाइंड क्रिकेट स्पर्धा


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा