Advertisement

किक बाॅक्सिंग स्पर्धेत खेळाडू जखमी, आयोजकांनी झटकली उपचारांची जबाबदारी


किक बाॅक्सिंग स्पर्धेत खेळाडू जखमी, आयोजकांनी झटकली उपचारांची जबाबदारी
SHARES

खेळ कुठलाही असाे प्रत्येक खेळाडू सामना जिंकण्यासाठी जीवतोड मेहनत करतो, शारीरिक क्षमता पणाला लावतो. पण खेळ संघटना, पदाधिकारी आणि स्पर्धा आयोजकांच्या उदासीन वृत्तीमुळे कधी कधी अशा खेळाडूला त्रासालाही सामोरे जावे लागते. असा प्रकार नुकताच एका किक बाॅक्सिंग स्पर्धेदरम्यान घडला आहे.

सोमय्या कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी कावेरी सिंह ही खेळाडू कांदिवलीत मुंबई उपनगर किक बाॅक्सिंगतर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत खेळत होती. ही स्पर्धा सुरू असताना कावेरी गंभीर जखमी झाली. तिच्या डोळ्याला आणि तोंडाला जबर दुखापत झाली. तिला डोळाही उघडता येत नव्हता. मात्र स्पर्धेच्या ठिकाणी डॉक्टर तर सोडाच प्रथमोपचार देण्याची सोय देखील नव्हती. अशा स्थितीत आयोजकांनी कावेरीला त्वरीत जवळच्या डाॅक्टरांकडे नेण्याची गरज असताना त्यांनी कावेरीकडे दुर्लक्ष केल्याचे कावेरीच्या प्रशिक्षकांनी सांगितले.

'डिस्ट्रीक्ट स्पोर्ट्स आॅफिसर' (डिएसओ) अनेकदा अशा स्पर्धांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच आयोजकांकडून असे प्रकार घडतात, असेही त्यांनी सांगितले.

कावेरीच्या डाव्या डोळ्यात रक्त गोठल्यामुळे तिला पापणी उघडताना त्रास होत असून तिला चक्कर येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

कावेरी सध्या सोमय्या काॅलेजमध्ये ११ वी चे शिक्षण घेत असून ती गेल्या ४ वर्षांपासून किक बॉक्सिंग खेळत आहे.


मला जेव्हा दुखापत झाली तेव्हा आयोजकांनी माझ्या दुखापतीची दखल घेतली नाही. तिथे डॉक्टर देखील उपस्थित नव्हते. प्रशिक्षक खेळाडूंना नेहमी सकारात्मक ऊर्जा देत असतात. ते मला खेळण्यासाठी बळजबरी करत नव्हते. मला खूप दुखापत झाल्याचे जेव्हा त्यांना समजले, तेव्हा प्रशिक्षकांनी मला उचलले आणि डॉक्टरांकडे नेले. आयोजकांनी कोणतीच वैद्यकीय सुविधा पुरवली नाही.

- कावेरी सिंह, खेळाडू


अशी घटना जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या निदर्शनास येणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे आयुष्य महत्त्वाचे नाही का? किक बाॅक्सिंग अनेकांच्या आवडीचा खेळ आहे. पण आयोजक या खेळाला प्राधान्य देत नसतील, तर विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका आहे. स्पर्धेच्या आयोजनादरम्यान आयोजकांवर मोठी जबाबदारी असते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळू नये, असेही कावेरीचे प्रशिक्षक म्हणाले.


आम्ही दरवर्षी अशा स्पर्धा भरवतो. खेळाडूला दुखापत झाल्यास आम्ही त्यांना त्वरीत बँडेज, मलमपट्टी यांसारखे प्राथमिक वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देतो. डीएसओ कडून पाहिजे तसे मानधन मिळत नसल्यामुळे मिळणारे पैसे हे टेबल, स्पीकर, पंच इतर गोष्टींसाठी खर्च होतात. कावेरीला लागले तेव्हा आम्ही खेळ थांबवला. पण त्यांच्या प्रशिक्षकांनी त्यांच्यावर खेळण्यासाठी दबाव टाकला.

- संतोष खंदारे, अध्यक्ष, मुंबई उपनगर किक बॉक्सिंग


हेही वाचा - 

उद्याचे खेळाडू की आजचे मजूर?



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा