Advertisement

नव्या अवकाश क्रांतीचा श्रीगणेशा !


नव्या अवकाश क्रांतीचा श्रीगणेशा !
SHARES

गुरुवारी गौरी-गणेशाच्या साक्षीने संध्याकाळी ६ वाजून ५९ मिनिटांनी इस्रोचे वर्कहॉर्स पी.एस.एल.व्ही. एक्स एल रॉकेट आपल्या ४१ व्या उड्डाणासाठी झेपावले. (या रॉकेटने सलग ४० उड्डाणे यशस्वी केली होती.) १४२५ किलोग्राम वजनाचा आय.आर.एन.एस.एस.-१ एच या उपग्रहाला त्याच्या कक्षेत स्थापन करण्यात इस्त्रोला या प्रयत्नात भलेही अपयश आले असले, तरी भारताने यानिमित्ताने एका नवीन क्रांतीचा श्रीगणेशा केला अाहे. इंडियन स्पेस इंडस्ट्री हे नाव येत्या काळात जगात तसेच भारतीयांच्या ओठांवर रुळेल.

१९ एप्रिल १९७५ चा दिवस भारतासाठी खूप महत्वाचा ठरला. 'कॉसमॉस ३ एम' या रॉकेटच्या साहाय्याने भारताने आपला पहिला उपग्रह आर्यभट्ट सोव्हिएत युनियन म्हणजेच रशियाच्या साहाय्याने प्रक्षेपित केला.

त्यानंतर, गेल्या ४० वर्षांत भारताने मागे वळून पाहिलेले नाही. एकेकाळी रशियाची मदत घेणारा भारत स्वतःचे उपग्रह स्वतःच प्रक्षेपित करू लागला. इतक्यावरच न थांबता भारताने दुसऱ्या राष्ट्रांचे उपग्रह आधी मदतीतून, तर नंतर धंदेवाईक दृष्टीने प्रक्षेपित करण्याची जबाबदारी उचलली.



या सगळ्या प्रवासात भारताने म्हणजेच 'इस्रो'ने आपल्या शिरपेचात यशस्वीतेचे अनेक तुरे रोवले. एकाचवेळी १०४ उपग्रह प्रक्षेपित करत भारताने जागतिक विक्रम आपल्या नावावर केला. ज्या रशियाच्या मदतीने भारताने आपला पहिला उपग्रह सोडला, त्याच रशियाचा विक्रम ४ पटींनी मोडावा, हा कोणता चमत्कार नाही तर, भारतीय संशोधक, वैज्ञानिक, अभियंते यांच्या मेहनतीचे ते फळ आहे. १९७५ ते आजपर्यंतच्या कालावधीत इस्रोने तब्बल १५० पेक्षा जास्त मोहिमा यशस्वी केल्या आहेत.

उपग्रह निर्मिती आणि त्यांचं प्रक्षेपण या दोन्ही क्षेत्रांत आपला उत्कर्ष साधताना इस्रोने आपला एक वेगळा ठसा जागतिक पातळीवर उमटवला. चंद्रावर पाणी शोधणारी पहिली मोहीम, मंगळावर पहिल्याच प्रयत्नात उपग्रह मंगळाच्या कक्षेत स्थापन करणारा जगातला पहिला देश, अशा कामगिरीमुळे जागतिक पातळीवर इस्रो तसेच भारताच स्थान कमालीचे उंचावले. या सगळ्याला गुणवत्तेबरोबर किफायीतशीर किमतीचे एक वेगळे कोंदण भारताने अवकाश क्षेत्रात निर्माण केले. त्यामुळे जगाचे लक्ष भारताकडे वेधले गेले आहे. काही वर्षांपूर्वी भारतात जी 'इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी' क्रांती झाली. त्याच धर्तीवर, भारत आता अवकाश तंत्रज्ञान क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा आहे.


गुणवत्तेसोबत कमी पैशांत दर्जा राखणारी स्पेस एजन्सी म्हणून इस्रोचे स्थान उंचावलेले असतानाच कामाचा व्याप प्रचंड वाढतो आहे. एकेकाळी वर्षाला एखाद-दुसरे प्रक्षेपण करणाऱ्या 'इस्रो'ला आता वर्षाकाठी २० पेक्षा जास्त उड्डाणांची गरज आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात उपग्रह निर्मिती तसेच रॉकेट निर्माणासोबत त्यांचे प्रक्षेपण या सर्वांचे नियोजन इस्रोला स्वबळावर करणे जड जात आहे. म्हणूनच, इस्रोने आपले तंत्रज्ञान भारतातील उद्योगांसाठी खुले केले आहे. आधी हे उद्योग समूह इस्रोला वेगवेगळे भाग बनवून द्यायचे. पण, आता पूर्ण उपग्रह प्रणालीचे निर्माण करण्याची जबाबदारी इस्रोने या उद्योगांकडे देण्याचे ठरवले आहे. इस्रो भारतासाठी कम्युनिकेशन, रिमोट सेन्सिंग, नेव्हिगेशन, वैज्ञानिक अशा चार स्वरूपाचे उपग्रह बनवते. या सर्व श्रेणीतील उपग्रह निर्मितीसाठी इस्रोने आपले दरवाजे खुले केले आहेत.

१००० किलोपासून ते ४००० किलोपर्यंत वजन असणारे हे उपग्रह प्रचंड किंमतीचे असतात. एक २००० किलो वजनाचा उपग्रह बनवायला इस्रोला २०० कोटी रुपयांचा खर्च येतो. म्हणजे, भारतातील उद्योगांनी वर्षाकाठी १८ ते २० उपग्रह निर्मिती जरी केली, तरी कित्येक कोटी रुपयांची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. हे झाले फक्त इस्रोसाठीच्या उपग्रहनिर्मितीपुरते. यात जर परदेशी कंपन्यांची मागणी विचारात घेतली तर हा आकडा किती मोठा होईल, याचा विचार करा!



भारतातील उपग्रह निर्मितीचा खर्च हा जागतिक पातळीवर सर्वात कमी आहे. आय.टी.च्या बाबतीत जे झाले तेच आता अवकाश तंत्रज्ञानाच्या बाबतीत होत आहे. ३०० बिलियन अमेरिकन डॉलर्स, इतक्या प्रचंड किमतीची बाजारपेठ भारताकडे सरकण्याची पूर्ण शक्यता आहे. स्वस्त, मस्त आणि उत्कृष्ट अशा तिन्ही पातळ्यांवर आपण आपला उत्कर्ष केलेला आहे. इस्रोच्या तंत्रज्ञान हस्तांतरण करण्यामुळे या जटील तंत्रज्ञांनावर प्रभुत्व भारतीय कंपन्यांना गाजवता येणार आहे. यामुळे भारतात अवकाश-तंत्रज्ञान क्षेत्रात प्रचंड रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.



आणि, ३१ ऑगस्ट २०१७ ला याचा श्रीगणेशा होत आहे. भारतात पहिल्यांदाच इस्रोशिवाय एका प्रायवेट इंडस्ट्रीने बनवलेला उपग्रह प्रक्षेपित होत आहे. आय.आर.एन.एस.एस.- १ एच या उपग्रह निर्मितीतील २५% काम हे अल्फा डिझाईन टेक्नॉलॉजीने केले आहे. या निर्मितीने प्रेरित होऊन इस्रोने पुढील ३ वर्षांसाठी वर्षाला १८ या वेगाने उपग्रह निर्मितीसाठी भारतातल्या अनेक प्रायव्हेट कंपन्या, स्टार्ट-अप्सना निमंत्रित केले आहे. ही खूप मोठी संधी, बाजारपेठ भारतात उपलब्ध झाली आहे ती इस्रोमुळे! इस्रोतील वैज्ञानिक, अभियंते, संशोधक यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे आपण एका नव्या क्रांतीच्या उंबरठ्यावर उभे आहोत. हरित क्रांती जमिनीवर, माहिती-तंत्रज्ञान क्रांती कॉम्प्यूटरवर घडवून जगभरात चर्चेत राहणार भारत आता आकाशात अवकाशक्रांती घडवण्यासाठी सज्ज झाला आहे. आपण त्याचे साक्षीदार आहोत हे आपले भाग्य आहे.

Originally published here - Facebook



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा