Advertisement

विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाचं अॅप


विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाचं अॅप
SHARES

मुंबई विद्यापीठातील विविध कार्यकम, शैक्षणिक योजना आणि परीक्षांचे वेळापत्रक या सर्वबाबी आता विद्यार्थ्यांना एका टचवर उपलब्ध होणार आहेत. यासाठी विद्यापीठ लवकरच एक मोबाइल अॅप सुरू करणार असून याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तसंच विद्यार्थ्यांना त्यांच्या तपासलेल्या उत्तरपत्रिका त्यांच्या लॉगइनवर उपलब्ध करून देण्याचा विचारही विद्यापीठातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.


कसा कराल वापर?

मुंबई विद्यापीठाचा कारभार अधिक तंत्रस्नेही आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने विद्यापीठाने व्यवस्थेत अमूलाग्र बदल करायचं ठरवलं आहे. याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना मोबाइल अॅप देण्यात येणार आहे. हे अॅप विद्यार्थी त्यांच्या 'पीआरएन' क्रमांकाशी जोडून वापरू शकेल. याचा फायदा विद्यार्थ्यांपर्यंत सूचना पोहोचवण्यासाठी होईल. मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिका त्यांच्या विद्यापीठाच्या वेबसाइटमधील लॉगइनमध्ये वेबपोर्टलवर पाहता येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांनी दिली.

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणाऱ्या परीक्षेसाठी नवीन उत्तरपत्रिका तयार करण्यात येणार असून त्यात विद्यार्थ्यांचा बैठक क्रमांक, तारीख, विषयांचं नाव यांसारखी इतर माहिती उपलब्ध असणार आहे.


एमफिल, पीएचडीची परीक्षा ऑनलाईन

लवकरच विद्यापीठाच्या एमफिल आणि पीएचडीची परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येणार असून विद्यार्थ्याला पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना पदवीसारखा प्रवेशपूर्व नोंदणी अर्ज ऑनलाईन भरणे आवश्यक असणार आहे. त्याशिवाय सध्या शिक्षकांना उत्तरपत्रिकेचं मूल्यांकन करण्यासाठी महाविद्यालयातील मूल्यांकन केंद्रात जावं लागत असल्यानं शिक्षकांना सुरक्षेच्या बाबी तपासून लॅपटॉपवर मूल्यांकन करण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्याचा विद्यापीठाचा विचार आहे.


इतक्या उत्तरपत्रिकेांचं मूल्यांकन सुरू

नुकत्याच झालेल्या पत्रकार परीषदेत परीक्षा आणि निकाल या विषयावर मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रात १६ लाख ६२ हजार ७६७ उत्तरपत्रिका उपलब्ध असून त्यातील १४ लाख ७६ हजार ३७९ उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण झाले आहेत. तसचं १ लाख ८६ हजार ३८८ उत्तरपत्रिकेांचं मूल्यांकन सध्या सुरू असल्याची माहिती परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी दिली. या पत्रकार परिषदेत मुंबई विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे व परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे उपस्थित होते.


इतक्या परीक्षांचे निकाल जाहीर

आतापर्यंत मुंबई विद्यापीठाच्या ४९० परीक्षांपैकी १५८ परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. हिवाळी सत्रात पुनर्मूल्यांकनासाठी ७५ हजार ७९९ अर्ज आले असून त्यापैकी ७४ हजार ६९१ उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकन पूर्ण झाले आहेत. ११०८ उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनाचं काम सुरू असून त्यांचेही निकाल लवकर जाहीर होतील, अशी माहिती घाटुळे यांनी दिली

मुंबई विद्यापीठानं उन्हाळी सत्राचे मूल्यांकन करताना सर्व तांत्रिक अडचणी दूर केल्या. शिक्षकांनी उन्हाळी सुट्टीतही मोठ्या प्रमाणावर मूल्यांकन केलं आहे. प्राचार्य आणि विद्यापीठाशी संबंधित सर्व घटकांनी सामूहिकरीत्या सहकार्य केल्यामुळेच उन्हाळी सत्राचे निकाल वेळेवर लागले. येत्या काही दिवसांत मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानस्नेही बनवण्यासाठी एक अॅपचंही लाँचिंग करण्यात येणार आहे.
डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ


येत्या ५ वर्षांचा शैक्षणिक आराखड्याबाबत मुंबई विद्यापीठानं विद्यार्थी पालक तसंच विविध तज्ज्ञांनांकडून मत आणि सूचना मागवली होती. या आराखड्याबाबत मुंबई विद्यापीठाकडे जवळपास ३५०० सूचना आल्या आहेत. विद्यापीठ प्रशासन या सर्व सूचनांचा नीट विचार करणार आहे. त्याबदलचं काही बदलही विद्यापीठात येत्या ५ वर्षांत पाहायला मिळेल.
- डॉ. रविंद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू, मुंबई विद्यापीठ


हेही वाचा - 

मुंबई विद्यापीठाला १६१ वर्ष पूर्ण

मुंबई विद्यापीठाचे आणखी ३ निकाल जाहीर

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा