Advertisement

आपलं सेकंड होम असेल तरी कसं?


आपलं सेकंड होम असेल तरी कसं?
SHARES

आपलं एक घर झाल्यावर अजून एक सेकंड होम असावं, असं आपल्याला नेहमीच वाटत असतं. म्हणूनच, त्याचा शोध घेतला जातो आणि ते कसं असेल याबाबतचे आपले इमले मनात तयारही असतात.

शेवटी वैज्ञानिक हा पण माणूसच! पृथ्वीपलीकडे दुसरं घर असू शकेल का? ह्याचं उत्तर माणूस गेली कित्येक वर्ष शोधतो आहे. आताच्या तंत्रज्ञान प्रगतीने माणसाला ही संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हणूनच नासासारख्या संस्था अवकाशात या गोष्टींचा शोध घेत आहेत.

मिल्की वे ह्या आपल्या आकाशगंगेत सूर्यासारखे तब्बल २०० बिलियन तारे आहेत. म्हणजे, आजूबाजूला कुठेही बघण्याआधी आपल्या माजघरात आपलं सेकंड होम शोधणं हेच मोठं दिव्य आहे. त्यासाठीच नासाने २००९ साली केपलर दुर्बीण अवकाशात पाठवली.



केपलर दुर्बिणीच्या साहाय्याने आत्तापर्यंत असे २५०० तारे शोधण्यात आले आहेत, ज्यांच्याभोवती आपल्यासारखीच सौरमाला अस्तित्वात आहे. या ताऱ्यांभोवती आपल्या सौरमालेसारखेच ग्रह कक्षेत फिरत आहेत. हे पण अगदी छोटासा भाग आहे, जो की आपण आजवर शोधू शकलो आहोत. या ग्रहांना एक्सोप्लॅनेट असं म्हटलं जातं. म्हणजे, पृथ्वी पण सूर्याचा एक्सोप्लॅनेट आहे. अशा ग्रहांना अवकाशात शोधणं कठीण आहे.

आपल्याला ग्रह, तारे रात्रीच का दिसतात? तर, सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे बाकीच्या अवकाशातून येणारा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. असंच या ग्रहांच्या बाबतीत होतं. ते ज्या ताऱ्याच्या कक्षेत फिरत असतील, त्या ताऱ्याचा प्रकाश इतका प्रखर असतो की ट्रिलीयन किलोमीटरवरून त्या ग्रहाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मग, आपलं सेकंड होम शोधायचं कसं? हे बघण मोठं रंजक आहे.



एक्सोप्लॅनेट शोधण्यासाठी दोन पद्धती वापरात येतात. एक म्हणजे, वोबली तारे शोधणे. ज्या ताऱ्यांच्या कक्षेत ग्रह फिरत आहेत. ते तारे आपल्या कक्षेत समान वर्तुळाकार फिरत नाही. लांब अंतरावरून बघताना हे असं समान न फिरणं वोबलिंग इफेक्ट देत. म्हणजे, गाडीचा किंवा सायकलचा टायर सेंटरमध्ये नसेल, तर कसा फिरताना दिसतो तसं. या पद्धतीचा वापर करून अनेक ग्रहांचं अस्तित्व शोधण्यात आलं आहे. पण यासाठी ग्रहाचं वस्तुमान गुरु ग्रहाएवढं किंवा त्यापेक्षा जास्ती असेल तर हे दिसून येतं. म्हणजे, पृथ्वीसारखे ग्रह शोधायला ही पद्धत उपयोगी पडत नाही.

आपलं सेकंड होम पण कोणत्याही सौरमालेत स्वीट स्पॉटला असणं अत्यंत गरजेचं आहे. वैज्ञानिक भाषेत हॅबिटेबल झोन असं म्हणतात. केपलर दुर्बीण ज्या तंत्रज्ञानाचा वापर करून असे एक्सोप्लॅनेट शोधते त्याला म्हणतात ट्रान्झिट मेथड! आपली पृथ्वी जेव्हा सूर्यासमोरून जाते तेव्हा, त्याला ट्रान्झिट असं म्हणतात. 

जेव्हा कोणताही ग्रह आपल्या ताऱ्यासमोरून जातो तेव्हा, लांबून बघताना त्याचं तेज थोडं काळवंडलं जातं. कारण, या ताऱ्याकडून येणारा प्रकाश हा ग्रहामुळे अडला जातो. वैज्ञानिक या दोन्ही प्रकाशातील बदलांचा अभ्यास करून ग्रहाची साईज ओळखू शकतात. तसेच, दोन ट्रान्झिटमधील वेळेचा अभ्यास करून तो त्या ताऱ्यापासून किती लांब आहे हे ओळखू शकतात. या अंतरावरून त्या ग्रहावरचं तापमान किती असेल, पाण्याचं अस्तित्व कसं असेल याचंही अनुमान आपल्याला लावता येतं. असे ग्रह जर स्वीट स्पॉटवर असतील तर, तिकडे द्रवरूप पाण्याचं अस्तित्व शक्य आहे. पाणी म्हणजे जीवन असणं किंवा पुढे अस्तित्वात येणं अशा ग्रहांवर नक्कीच शक्य आहे.



असे एक्सोप्लॅनेट शोधताना अनेक विस्मयकारक ग्रह समोर आले आहेत. एच.डी. ४०३०७ जी नावाचा ग्रह पृथ्वीच्या वस्तुमानाच्या ८ पट आहे. म्हणजे तिथं आपलं वजन हे जवळपास दुप्पट जाणवेल.

केपलर – १६ बी नावाचा ग्रह एकाच वेळी दोन ताऱ्यांभोवती प्रदक्षिणा घालतो. म्हणजे, या ग्रहावर सूर्यास्ताच्या वेळेला दोन सूर्यांचा अस्त होताना दिसेल.

TRAPPIST-1 ह्या ग्रहमालेत ७ पृथ्वीसारखे ग्रह आसपास फिरत आहेत. म्हणजे ह्यातल्या एका ग्रहावर आपण उभे राहिलो तर ६ ग्रह आपल्याला क्षितिजावर दिसतील. ह्या सगळ्या ग्रहांवर पाणी असण्याची शक्यता आहे. कारण ह्यांचा आकार आणि ताऱ्याभोवती फिरण्याची कक्षा आपल्या पृथ्वीसारखीच आहे.



सेकंड होम हे प्रत्येकाचं स्वप्न असते. त्याची सुुरुवात जागा बघण्यापासून होते. आपल्याला आवडेल, पटेल आणि राहता येईल असं ठिकाण. त्या दृष्टीने मानवाने आपले प्रयत्न सुरू केले आहेत. २५०० अशा ताऱ्यांची नोंद केपलरने केली आहे. तर, अशा आणखी ५००० ताऱ्यांचा अभ्यास केला जाऊ शकतो, हे दाखवून दिलं आहे. नासा पुढल्या वर्षी अशा सेकंड होमच्या शोधासाठी जेम्स वेब दुर्बीण अवकाशात पाठवत आहे. केपलरपेक्षा ही दुर्बीण क्षमतेत अत्युच्य असून ह्यामुळे आपल्या सेकंड होमच्या शोधाला बळकटी मिळणार आहे.

अर्थात, हे सर्व ग्रह आणि सौरमाला आपल्यापासून प्रचंड अंतरावर आहेत. तिकडे पोहचणं हे मोठं दिव्य असेल. पण निदान मनासारखं सेकंड होम मिळालं तर आपण कसंही करून तिकडे जायचा प्रयत्न करूच. आपलं विश्व तर पलिकडची गोष्ट आहे. पण, आपल्याच माजघरात जर अशी जागा म्हणजेच ग्रह मिळाला तर तिकडे सेकंड होम असणं कोणाला आवडणार नाही. सध्या तरी या प्रचंड विश्वात आपलं एकच घर आहे, ते म्हणजे पृथ्वी. पृथ्वी व्यतिरिक्त अजून आपलं सेकंड होम किंवा सेकंड होमसाठी ग्रहाच्या रुपातील नव्या जागेचा शोध सुरूच आहे.    



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा