Advertisement

भारती सिंह, हर्ष लिंबाचीयाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केलेली प्रसिद्ध काॅमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचीया या दोघांनाही हाॅलिडे कोर्टासमोर हजर केलं असता, कोर्टाने या दोघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

भारती सिंह, हर्ष लिंबाचीयाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
SHARES

अंमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) अटक केलेली प्रसिद्ध टीव्ही काॅमेडियन भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचीया या दोघांनाही रविवार २२ नोव्हेंबर रोजी मुंबईतील हाॅलिडे कोर्टासमोर हजर केलं असता, कोर्टाने या दोघांनाही १४ दिवसांची (४ डिसेंबरपर्यंत) न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  

एनसीबीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एनडीपीएस अॅक्टनुसार व्यावसायिक वापराकरीता नसलेला १ हजार ग्रँम वजनापर्यंतचा गांजा आढळून आल्यास दोष सिद्ध झालेल्या आरोपीला किमान ६ महिन्यांचा कारावास आणि १० हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो.

एका ड्रग पेडलरने दिलेल्या माहितीनंतर एनसीबीच्या पथकाने शनिवारी २१ नोव्हेंबर रोजी सकाळी भारती सिंहचं अंधेरी, लोखंडवाला काॅप्लेक्स येथील घर आणि कार्यालयावर धाड टाकली होती. या धाडीत एनसीबीच्या पथकाला भारतीच्या घरात गांजा आढळून आला होता. 

हेही वाचा- १७ तासांच्या चौकशीनंतर भारतीच्या पतीलाही अटक

भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचीया या दोघांनीही गांजा बाळगल्याचं मान्य केल्यानंतर भारतीला अटक करण्यात आली. तर हर्ष याची एनसीबीने १७ तास कसून चौकशी केली आणि त्यानंतर त्यालाही अटक करण्यात आली.

भारतीच्या घरात एकूण ८६.५ ग्रॅम गांजा सापडला आहे. हा गांजा एनसीबीच्या पथकाने जप्त केला आहे. याआधी एनसीबीने भारती सिंहला याप्रकरणी समन्स देखील बजावलं होतं.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर अंमली पदार्थ विरोधी पथक बाॅलिवूड कलाकारांच्या पाठिमागे हात धुवून लागलेलं आहे. याआधी देखील टीव्ही कलाकार सनम जोहर आणि अबीगैल पांडे, बाॅलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल, निर्माता फिरोज नाडियाडवाला यांच्या घरात एनसीबीने छापेमारी केली होती. 

सोबतच एनसीबीने खारदांडा परिसरातही शनिवारी छापा टाकला होता. या छाप्यात एका २१ वर्षीय दलालाला पकडण्यात आलं असून त्याच्याकडे एलसीडीच्या १५ डब्या, ४० ग्रॅम गांजा तसंच निट्राझेपाम या प्रतिबंधित अमली पदार्थांचा साठा सापडला आहे.  

हेही वाचा- प्रसिद्ध काॅमेडियन भारतीला ड्रग्जप्रकरणी अटक

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement