Advertisement

फ्लॅशबॅक २०१८ : बालरंगभूमी 'मोठी' झाली!

२०१८ मध्ये रंगभूमीवर आलेलं मतकरी यांचं 'अलबत्या गलबत्या' हे नाटक खऱ्या अर्थाने बालरंगभूमीला नवसंजीवनी देणारं ठरलं आहे. या नाटकानं बालनाटकाला एक वेगळाच प्रेक्षकवर्ग मिळवून दिला. तसं पाहिलं तर बालनाटकाला नेहमीच लहान मुलं आणि त्यांचे पालक असा प्रेक्षक वर्ग लाभतो. पण या नाटकाने लहान मुलांच्या जोडीला मोठ्यांचंही लक्ष वेधून घेतलं. यापूर्वी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकरांनी रंगभूमीवर सादर केलेली चेटकीण नव्या संचातील नाटकात वैभव मांगलेने साकारली.

फ्लॅशबॅक २०१८ : बालरंगभूमी 'मोठी' झाली!
SHARES

नाटकातही विविध प्रकार असतात. प्रायोगिक रंगभूमीपासून व्यावसायिक रंगभूमीपर्यंत विविध प्रकारची नाटकं रसिकांचं मनोरंजन करत असतात. या प्रकारांमध्येही विविध मूड्समधील नाटकांचा समावेश असतो. या सर्वांच्या पलिकडे असलेला नाट्यप्रकार म्हणजे बालनाट्य... पूर्वी बालरंगभूमीला सोन्याचे दिवस होते. अलिकडच्या काळात बालनाट्य काहीशी मागे पडली असली, तरी २०१८ मध्ये रंगभूमीवर आलेल्या ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या 'अलबत्या गलबत्या' या बालनाट्याने बालरंगभूमीला नवसंजीवनी देण्याचं काम केलं आहे.


बालरंगभूमीची हुकूमत 

बालरंगभूमी समृद्ध करणाऱ्या नाटककारांच्या यादीत आज रत्नाकर मतकरी यांचं नाव आदरानं घेतलं जातं. त्यांच्या इतक्याच इमाने इतबारे आणखीही काही नाटककारांनी बालरंगभूमीची सेवा केली आहे. सुधा करमरकर, सुलभा देशपांडे, नरेंद्र बल्लाळ, सई परांजपे, श्रीधर राजगुरू, वंदना विटणकर, जयंत तारे, प्रकाश पारखी, संजय पेंडसे, अशोक पावसकर, कांचन सोनटक्के, लीला हडप, विनोद हडप, रामनाथ थरवळ, राजू तुलालवार, राजा बडे यांसारख्या बऱ्याच दिग्गजांनी आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून केवळ बालरंगभूमी समृद्ध केली नाही, तर भावी पिढीतील कलाकार-तंत्रज्ञांना घडवण्याचं कार्यही केलं आहे. या रंगभूमीवरून आलेले बरेच कलाकार आज मराठी रंगभूमीपासून चित्रपटसृष्टीपर्यंत सगळीकडेच हुकूमत गाजवत आहेत.


कलाकारही दिले

दिवंगत अभिनेत्री सुलभा देशपांडे यांनी बालरंगभूमीसाठी केलेलं कार्यही फार मोलाचं आहे. 'अविष्कार' या संस्थेच्या माध्यमातून अनेकांना घडवत त्यांनी 'दुर्गा झाली गौरी'सारखं अजरामर नाटकही रसिकांना दिलं आहे. सुधा करमरकरांच्या 'बजरबट्टू', 'सात बुटके' यांसारख्या बऱ्याच नाटकांनी रंगभूमीला अतुल परचुरेसारखे बरेच कलाकारही दिले आहेत. कमलाकर सोनटक्के यांच्या पत्नी कांचन सोनटक्के यांनी आपलं जीवन अपंग मुलांच्या सेवेसाठी वाहिलं होतं. त्यांनी अपंग मुंलांना घेऊन बालनाट्य सादर केलं होतं. रामनाथ थरवळ हे मराठीत नव्हे, तर हिंदी भाषेमध्ये बालनाट्य सादर करण्यासाठी परिचीत आहेत. अशोक पावसकर यांचं कार्यही खूप मोठं असून, ते नेहमीच विविध विषयांवर आधारित बालनाट्य रंगभूमीवर आणत असतात.


बालनाटकाचा प्रेक्षकवर्ग

या सर्वांमध्ये २०१८ मध्ये रंगभूमीवर आलेलं मतकरी यांचं 'अलबत्या गलबत्या' हे नाटक खऱ्या अर्थाने बालरंगभूमीला नवसंजीवनी देणारं आहे. या नाटकानं बालनाटकाला एक वेगळाच प्रेक्षकवर्ग मिळवून दिला. तसं पाहिलं तर बालनाटकाला नेहमीच लहान मुलं आणि त्यांचे पालक असा प्रेक्षक वर्ग लाभतो. पण या नाटकाने लहान मुलांच्या जोडीला मोठ्यांचंही लक्ष वेधून घेतलं. यापूर्वी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकरांनी रंगभूमीवर सादर केलेली चेटकीण नव्या संचातील नाटकात वैभव मांगलेने साकारली. गेटअप, हावभाव, लकबी, चालणं, बोलणं यातून वैभवने साकारलेल्या या चेटकिणीने अनेकांना आपल्या प्रेमात पाडलं.


एकाच दिवशी ५ प्रयोग

झी स्टुडिओजची प्रस्तुती असल्याने हे नाटक एका वेगळ्याच उंचीवर पोहोचलं यात शंका नाही, पण मुळात या नाटकाचा गाभाच अतिशय सुरेख असून, लेखन पातळीवर रत्नाकर मतकरींनी केलेलं काम मन मोहून घेणारं आहे. सेटपासून कॅास्च्युमपर्यंत आणि नेपथ्यापासून प्रकाशयोजनेपर्यंत सर्वच पातळीवर अचूक काम झाल्याने एकच नाटक पुन: पुन्हा पाहणाऱ्यांची गर्दी वाढल्याचं चित्र पाहायला मिळालं. वैभव मांगलेने पाठीचं दुखणं असूनही या नाटकाचे एकाच दिवशी ५ प्रयोग करण्याचा विश्वविक्रम केला तो प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेमाच्या बळावरच...


रंगभूमीचंच दालन

'अलबत्या गलबत्या' या नाटकाला मिळालेल्या यशाबद्दल आणि बालरंगभूमीच्या वाटचालीबद्दल 'मुंबई लाइव्ह'शी एक्सक्लुझिव्ह बोलताना मतकरी म्हणाले की, झी स्टुडिओजमुळे हे नाटक भव्य-दिव्य स्वरूपात रसिकांपर्यंत पोहोचणं शक्य झालं. पूर्वी सुधा करमरकर वगैरे आम्ही मंडळी वर्षाकाठी १०० प्रयोग करायचो, पण मध्यंतरी ते थांबलं होतं. झीमुळे 'अलबत्या गलबत्या'चा प्रवास पुन्हा एकदा सुरू झाला असून, एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहे.

बालरंगभूमीसाठी लेखन करणं खूप कठीण असतं. जे नाटककार प्रौढांसाठी चांगलं नाटक लिहू शकतात त्यांनीच पुढाकार घेऊन लेखन करायला हवं. कारण बालरंगभूमी हे रंगभूमीचंच एक दालन आहे. इथे लेखन करण्यासाठी आपली एक वेगळी शैली, मुलांसोबत अंडरस्टँडींग आणि अफाट कल्पनाशक्तीची गरज आहे. केवळ एक नाटक जोरात चालल्यानं बालरंगभूमीला चालना मिळाली असं म्हणता येणार नाही. यासाठी प्रत्येकाने सातत्याने प्रयत्न करणं गरजेचं आहे.


४० वर्षांपासून सेवा 

नरेंद्र बल्लाळ यांच्याकडून बालरंगभूमीची सेवा करण्याची दीक्षा घेतलेले अशोक पावसकरही मागील ४० वर्षांपासून आपल्या परीने बालनाट्यांच्या माध्यमातून नवनवीन कलाकार घडवण्याचं कार्य करीत आहेत. पत्नी चित्रा पावसकर यांच्या साथीने त्यांनी बऱ्याच बालनाट्यांची निर्मिती केली आहे. १९७२ मध्ये त्यांनी 'परीकथेतील राजकुमार' हे पहिलं नाट्यपुष्प रंगभूमीवर सादर केलं. त्यानंतर 'जाड्या, रड्या आणि चमचा', 'पाचू नगरीत अंजू' अशी बरीच नाटकं रंगभूमीवर आणली. नंतर दूरदर्शनच्या माध्यमातून 'उलट्याचं सुलट, सुलट्याचं उलट', 'भटक्याचं भविष्य', 'होळी रे होळी' ही नाटकं छोट्या पडद्यावर आणली. पावसकरांची 'तिळा तिळा दार उघड' ही लहानग्यांसाठी तयार केलेली मालिकाही खूप गाजली.


एकाच तिकीटात अनेक नाटकं

पूर्वी व्यावसायिक नाटकांप्रमाणेच बालनाट्यही तीन अंकी असायची. पण राजू तुलालवार यांनी त्यांची लांबी कमी करून दोन अंकी नाटकांचा ट्रेंड सुरू केला. त्यात माँटेसरीपासून पहिली-दुसरीतील मुलांना घेऊन नाटकं करत त्यांनी बरेच कलाकार घडवले. पुढे इंग्रजी माध्यमातील शिक्षणाचा प्रभाव मराठी बालनाट्यावर पडू लागला आणि बालनाट्यांची संख्या हळूहळू रोडावू लागली. त्यामुळे मोठ्या अवधीच्या नाटकांऐवजी कमी अवधीच्या नाटकांना पसंती मिळू लागली. यात एकाच तिकीटात चार-पाच नाटकं सादर करण्याचा नवीन ट्रेंड सुरू झाला.


कलाकार घडवण्याचं माध्यम

बालरंगभूमीच्या आजच्या अवस्थेबाबत 'मुंबई लाइव्ह'शी बातचीत करताना अशोक पावसकर म्हणाले की, आम्ही नाटकाकडे कधीच धंदा म्हणून पाहिलं नाही, तर बालनाट्य ही कलाकार घडवण्याचं माध्यम असल्याने त्याला नेहमीच एक मिशन मानलं. आम्ही २० दिवसांचं शिबिर घेऊन त्यात पाठांतरापासून गेटअपमध्ये व्यक्तिरेखा सादर करण्यापर्यंत सर्व पातळीवर मुलांना घडवण्याचं काम केलं जातं. 'तीन तासांमध्ये पाच नाटकं' या संकल्पनेमुळे मुलंही घडतात आणि प्रेक्षकांनाही कमी वेळेत जास्त नाटकं पाहिल्याचं समाधान मिळतं. बालनाट्यासाठी सकस लिखाण हवं. यासाठी आम्ही तीन वर्षांतून एकदा राज्यस्तरीय बालनाट्य लेखन स्पर्धा भरवतो. त्यातून जे उत्कृष्ट नाट्यलेखन असतं त्यावर नाटक बसवतो.


नाट्य परिषदेने पुढाकार घ्यावा 

 बालनाट्याला नवसंजीवनी देण्यासाठी नाट्य परिषदेनेही पुढाकार घेण्याची गरज आहे. मोहन जोशी अध्यक्ष असताना सोलापूर आणि नांदेडमध्ये जवळजवळ १ लाख मुलांनी बालनाट्यामध्ये सहभाग घेतला होता. प्रसाद कांबळी सध्याचे अध्यक्ष आहेत. त्यांनी बालनाट्यांकडे दुर्लक्ष करू नये. खर्चांवर निर्बंध आणून बालनाट्याला चालना द्यावी. इथूनच तुम्हाला रेडीमेड कलाकार मिळत असतात हे विसरता कामा नये. सरकारी पातळीवर बालनाट्य स्पर्धा भरवली जाते, पण त्यात गलथानपणा असतो. बालरंगभूमीला पोषक असलेल्या विषयांखेरीज इतर मुद्द्यांवर नाटकं सादर केली जातात.




हेही वाचा- 

दीपिका कक्कर इब्राहीम ठरली बीग बॉसच्या १२ व्या पर्वाची विजेती

श्रीदेवीची खुशी बाॅलीवूडच्या वाटेवर!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा