Advertisement

ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचं निधन

'अविष्कार' नाट्यसंस्थेचा मजबूत पाया म्हणून अरुण काकडे यांना ओळखलं जायचं. गेली ६७ वर्षे त्यांनी प्रायोगिक रंगभूमीशी असलेलं आपलं नातं टिकवून ठेवलं. वयाच्या ८९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचं निधन
SHARES

ज्येष्ठ रंगकर्मी, 'अविष्कार' नाट्यसंस्थेचे आधारस्तंभ आणि समांतर रंगभूमीवर 'रंगायन' संस्थेचे संस्थापक अरुण काकडे उर्फ काकडे काका यांचे आज (बुधवारी) निधन झाले. मुंबईतल्या निवासस्थानी दुपारी २.३० वाजता त्यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पन्नासहून अधिक वर्ष रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या अरुण काकडे यांच्या निधनानं समांतर रंगभूमीवर शोककळा पसरली आहे.

अनेक पुरस्काराचे मानकरी

'आविष्कार' नाट्यसंस्थेचा मजबूत पाया म्हणून अरुण काकडे यांना ओळखलं जायचं. गेली ६७ वर्षे त्यांनी प्रायोगिक रंगभूमीशी असलेलं आपलं नातं टिकवून ठेवलं. उतारवयातही त्यांनी अनेक नाटकं सादर केली. तरुणांना लाजवेल असाच त्यांचा उत्साह असायचा. रंगभूमीवरील योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कार देखील देण्यात आले होते. काकडे यांना संगीत नाटक अकादमी, झी मराठी जीवनगौरव, ध्यास-सन्मान या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.

काकडे काकांची कारकिर्द

  • पुण्यातून काकडे काकांच्या करिअरला सुरुवात झाली. त्यानंतर ते मुंबईत आले.
  • मुंबईत आल्यावर ते रंगायन या संस्थेशी जोडले गेले. विजया मेहता, अरविंद देशपांडे, विजय तेंडुलकर, माधव वाटवे या तेव्हाच्या तरुण रंगकर्मींनी 'रंगायन' ही संस्था सुरू केली होती. या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या नाटकांची निर्मिती होत असे.
  • 'रंगायन' मध्ये वाद झाल्यानं संस्था फुटली आणि अरविंद देशपांडे, विजया मेहता, सुलभा देशपांडे यांनी बाहेरचा रस्ता धरला. 
  • १९७१ मध्ये अरविंद देशपांडे, विजया मेहता, सुलभा देशपांडे यांनी 'आविष्कार' ही नवी नाट्यसंस्था स्थापन केली. त्यावेळी काकडे या मंडळींच्या खांद्याला खादा लावून उभे राहिले.
  • अविष्कार या संस्थेच्या व्यवस्थापनाची धुरा काकडे काकांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि तेव्हापासून काकडे काका म्हणजे 'आविष्कार' हे समीकरणच बनून गेलं.
  • 'आविष्कार' नं सुरू केलेल्या छबिलदास चळवळीमुळे अनेक नाट्यसंस्था आणि नाट्यकर्मी पुढे आले. रंगभूमीवरचे अनेक महत्त्वाचे प्रयोग या चळवळीच्या माध्यमातून झाले.

१२ नाटकांचा विक्रम

वयाची पंच्याहत्तरी थाटात साजरी करताना काकडे काकांनी १२ महिन्यांत १२ नवीन नाटकं 'आविष्कार' तर्फे रंगमंचावर आणली होती. रंगकर्मीच्या तीन पिढ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. काकडे काका स्वतः पडद्यामागे राहून प्रतिभावान नाट्यकर्मींना प्रोत्साहन द्यायचे. 



हेही वाचा

अजय फणसेकरांचा आणखी एक नवा प्रयोग!

हा मराठी कलाकारही करतोय डिजिटल विश्वात पदार्पण

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा