सातत्याने जनजागृती करूनही रेल्वे प्रवाशांच्या अपघातांचा आकडा वाढतोच आहे. याकडे पाहून मुंबईची 'लाइफलाइन' अशी ओळख असणारी लोकल रेल्वे प्रवाशांसाठी आता मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे दिसत आहे. हे सांगण्यामागचे कारण असे की, पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मिळून मागील 12 दिवसांत 94 रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील सर्वाधिक अपघात 7 जून ते 17 जून दरम्यान झाले आहेत.
रेल्वे रूळ ओलांडू नका, फूटबोर्डवर उभे राहू नका, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात येऊनही प्रवासी या आवाहनाकडे दुर्लक्षच करताना दिसतात. उपनगरीय रेल्वे मार्गांवर प्रामुख्याने रेल्वे रूळ ओलांडणे, चालत्या लोकलमध्ये चढणे किंवा उतरणे, दरवाजाला लटकणे आदी कारणांमुळे सर्वाधिक अपघात होतात. 7 जून ते 13 जून दरम्यान सलग 7 दिवस दररोज 10 ते 13 प्रवाशांचा विविध अपघातांमध्ये मृत्यू झाला आहे.
रेल्वे अपघातांतील मृतांची संख्या - (7 जून ते 18 जून) | |
---|---|
7 जून – 10 जणांचा मृत्यू | 13 जून – 9 जणांचा मृत्यू |
8 जून – 13 जणांचा मृत्यू | 14 जून – 9 जणांचा मृत्यू |
9 जून – 7 जणांचा मृत्यू | 15 जून – 4 जणांचा मृत्यू |
10 जून – 6 जणांचा मृत्यू | 16 जून – 7 जणांचा मृत्यू |
11 जून – 11 जणांचा मृत्यू | 17 जून – 8 जणांचा मृत्यू |
12 जून – 7 जणांचा मृत्यू | 18 जून – 3 जणांचा मृत्यू |
22 जून रोजी सुरक्षा परिषदेचे आयोजन-
सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे 22 जून रोजी रेल्वेच्या पाच विभागांच्या सुरक्षा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील सभागृहात ही परिषद होणार आहे. तब्बल 10 वर्षांनंतर अशा प्रकारची परिषद होत असून या परिषदेत प्रवाशांच्या सुरक्षेबाबत रेल्वेचे कर्मचारी आणि कामगार आपली मते मांडणार आहेत. कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या सूचना आणि नव्या कल्पनाही मांडल्या जाणार आहेत. या परिषदेला रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. परिषदेला मुंबईसह सोलापूर, पुणे, भुसावळ आणि नागपूर विभागातून कर्मचारी येणार आहेत, अशी माहिती सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे मंडल अध्यक्ष व्ही. एस. सोलंकी यांनी दिली.