Advertisement

शनिवारी सकाळी ६ वाजता सुटणार पहिली मोनो

९ नोव्हेंबरला पहाटे ५ वाजून १९ मिनिटांनी चेंबूर स्थानकातून वडाळ्याला निघालेल्या मोनोला म्हैसूर काॅलनी स्थानकादरम्यान आग लागली होती. त्यात मोनोचे दोन डबे जळून खाक झाले. त्यानंतर मोनोच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणांवरून मोनो सेवा बंद करण्यात आली.

शनिवारी सकाळी ६ वाजता सुटणार पहिली मोनो
SHARES

आग लागल्याने गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असलेली मोनोरेल शनिवारी १ सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याची अधिकृत घोषणा अखेर गुरूवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) कडून करण्यात आली. त्यानुसार शनिवारी सकाळी ६ वाजता वडाळा आणि चेंबूर स्थानकावरून मोनो सुटणार असल्याची माहिती एमएमआरडीएकडून एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.


 यंत्रणा तपासणीसाठी मोनो बंद

९ नोव्हेंबरला पहाटे ५ वाजून १९ मिनिटांनी चेंबूर स्थानकातून वडाळ्याला निघालेल्या मोनोला म्हैसूर काॅलनी स्थानकादरम्यान आग लागली होती. त्यात मोनोचे दोन डबे जळून खाक झाले. त्यानंतर मोनोच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणांवरून मोनो सेवा बंद करण्यात आली. मोनो गाड्या, सिंग्नल यंत्रणा आणि अग्निरोधक यंत्रणांची पुर्णत तपासणी करत आवश्यक उपाययोजना करण्याचा निर्णय घेत एमएमआरडीएनं मोनो सेवा पूर्णत बंद केली.


दिवसभरात १३० फेऱ्या

 सर्व चाचण्या, तपासण्या पूर्ण झाल्यानंतर आता अखेर नऊ महिन्यांतर मोनो पुन्हा ट्रॅकवर येणार आहे. शनिवारी सकाळी चेंबूर आणि वडाळा मोनो स्थानकातून पुन्हा एकदा पहिल्याप्रमाणं मोनोरेल सुटणार आहे. मोनोनं प्रवास करणारे प्रवासी खूपच कमी असले तरी त्यांच्यासाठी मात्र ही नक्कीच दिलासादायक बाब आहे. सकाळी ६ वाजता पहिली मोनो सुटणार असून शेवटची मोनो चेंबुर स्थानकावरून रात्री ९.५३ मिनिटांनी तर  वडाळा स्थानकातून १०.०८ मिनिटांनी सुटणार आहे. तर दर १५ मिनिटांनी मोनो सुटणार असून दिवसभरात मोनोच्या १३० फेऱ्या होणार असल्याचंही एमएमआरडीएकडून सांगण्यात आलं.

नवीन सुधारणा अल्पच

आगीच्या प्रकरणानंतर मोनो अधिक सुरक्षित करत मुंबईकरांच्या सेवेत दाखल  केली जात असल्याचा दावा एमएमआरडीएकडून केला जात आहे. मात्र, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोनो डब्यात याआधी जे सीसीटीव्ही कॅमेरे होते त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या जागी आणखी चांगले सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तर मोनो गाड्यांच्या टायरजवळ स्मोक डिटेक्टर लावण्यात आले आहेत. या दोन गोष्टी वगळल्या तर नवं काहीही वा वेगळं करण्यात आलेलं नाही. त्यामुळं आता ही मोनो किती आणि कशी सुरक्षित आहे हे येणार काळचं ठरवेल.



हेही वाचा - 

मुंबई ते न्यूयाॅर्कसाठी एअर इंडियाचे थेट विमान

१ सप्टेंबरपासून बिल नसल्यास रेल्वे स्टॉल्सवरील पदार्थ मोफत!




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा