बेस्टच्या तिकीटदरात होणार वाढ?

 Mumbai
बेस्टच्या तिकीटदरात होणार वाढ?

मुंबई -  तोट्यातील बेस्ट उपक्रमाला महापालिकेच्यावतीने आर्थिक मदतीचा हात पुढे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, ही आर्थिक मदत करण्यापूर्वी महापालिका आयुक्तांनी बेस्ट उपक्रमाला कृती आराखडा दिला असून या कृती आराखड्याला बेस्ट समितीने मंजुरी दिली तरच महापालिकेच्यावतीने मदत केली जाईल, असे महापालिकेने धोरण आखले आहे. महापालिकेच्या या कृती आराखड्यानुसार बेस्टच्या तिकीट दरात वाढ करण्याच्याही सूचना करण्यात आल्यामुळे भविष्यात बेस्टच्या तिकीटासाठी दहा रुपये मोजले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बेस्ट उपक्रमाला आर्थिक मदत करण्याच्यादृटीकोनातून महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांची सभा शनिवारी पार पडली. यापूर्वी बेस्टला केलेल्या सूचनेनुसार उपक्रमाने महापालिकेला आपला कृती आराखडा सादर करून एक हजार कोटी रुपये अनुदान देण्याची मागणी तसेच ही रक्कम बिनव्याजी मिळण्याची सूचना केली होती. त्या अनुषंगाने शनिवारी झालेल्या महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांच्या सभेमध्ये महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी महापालिकेच्यावतीने कृती आराखडा सादर करून यामध्ये महापालिका प्रशासनाने बसमार्गाचे सुसूत्रिकरण करण्याच्या सूचना केल्या आहेत. यामध्ये गर्दीच्यावेळी बस जास्त आणि दुपारच्यावेळी गर्दी कमी असलेलेल्या मार्गावरील बसेस अन्य मार्गावर वळवणे, आस्थापना खर्च कमी करणे, तिकीट दरात देण्यात येणारी सवलत रद्द करणे, कामगारांच्या वेतनकरार नव्याने बनवताना कोणतीही वाढ न देणे अशा सूचना करतानाच बस तिकीट दरातही वाढ करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे या कृती आराखड्याला बेस्ट समितीची मान्यता असेल तरच महापालिकेच्यावतीने जेवढा तोटा असेल तेवढी रक्कम दिली जाईल. ही रक्कम तीन महिन्यांपर्यंत महापालिका उपलब्ध करून देईल, असे महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी म्हटले आहे. सध्या सुरू असलेला बेस्ट तिकीट दर हा किमान आठ रुपये असून तो दहा रुपयांपर्यंत वाढवण्याची सूचना आयुक्तांनी केली असल्याचे काँग्रेसचे गटनेते रवी राजा यांनी सांगितले. परंतु तिकीटदरवाढ केल्यास प्रवाशांची संख्या कमी होईल, अशी भीती रवी राजा यांनी व्यक्त केली आहे. सध्या बसेस खरेदी करण्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद आहे, त्यातून नवीन बसेसची खरेदी केली जावी आणि भविष्यात खासगी बसेस भाड्याने घेण्याचा विचार केला जावा, अशी सूचना रवी राजा यांनी केली आहे. शंभर कोटी रुपयांमधून नवीन बसेसची खरेदी केली जाणार असल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी स्पष्ट करत येत्या मंगळवारी बेस्टला आर्थिक मदत देण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

Loading Comments