Advertisement

बसमध्ये फोनवर मोठ्या आवाजात बोलण्यावर बंदी

बेस्टनं प्रवाशांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

बसमध्ये फोनवर मोठ्या आवाजात बोलण्यावर बंदी
(File Image)
SHARES

मुंबईतून बेस्टच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. बेस्टनं प्रवाशांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

आता बेस्टच्या बसेसमधून प्रवास करताना प्रवाशांना मोबाईल फोनवर मोठ्या आवाजात बोलता येणार नााही. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

याशिवाय मोठ्या आवाजात गाणी ऐकणे किंवा व्हिडिओ पाहणे यावर देखील निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रवाशांना बेस्टच्या बसेसमधून प्रवास करताना हेडफोन्स वापरणं बंधनकारक करण्यात आलं आहे. बेस्टच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

नव्या नियमानुसार बेस्टमधून प्रवास करताना मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये प्रवास करत असताना प्रवाशांना मोबाईलवर गाणी ऐकताना, व्हिडिओ पाहताना किंवा फोनवरुन बोलताना हेडफोनचा वापर करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

एखादा व्यक्ती फोनवर मोठ्या आवाजात बोलत असल्यास इतर सह प्रवाशांना त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळं सहप्रवाशांची त्या त्रासातून सुटका व्हावी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बेस्टच्या प्रवक्त्यांनी पीटीआय या वृत्त संस्थेला दिली.

बेस्टकडे प्रवाशांच्या यासंदर्भात काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर बेस्ट प्रशासनाकडून याबाबत परिपत्रक जारी करण्यात आलं आहे.

बेस्टच्या बसेस ही सार्वजनिक सेवा आहे. यामुळं प्रवाशांना कसल्याही प्रकारची अडचण किंवा त्रास न होऊ देणं ही जबाबदारी आहे. एखाद्या प्रवाशाला दुसऱ्या प्रवाशाच्या गैरवर्तनामुळं त्रास होत असेल तर त्याच्यावर बॉम्बे पोलीस अॅक्ट ३८/११२ नुसार कारवाई केली जाईल असं म्हटलं.



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा