बेस्ट बसमधून प्रवास करताना तिकीट काढणे बंधनकारक असून देखील आज अनेक प्रवासी तिकीट न काढताच प्रवास करत आहेत. बेस्टला यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते आहे. त्यामुळे बेस्ट विभागाकडून फुकट्या प्रवाशांच्या मुसक्या आवळण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली.
बेस्ट बसमधून फुकट प्रवास करणे तसेच, तिकीट काढून प्रमाणित केलेल्या अंतरापेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात बेस्टने विशेष मोहीम सुरू केली आहे. बेस्टने 2017 मधील जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या चार महिन्यांत एकूण 25 हजार 575 फुकट्यांवर कारवाई करत त्यांच्याकडून 22,37,751 रुपये एवढी रक्कम दंडवसुली केली आहे. विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी प्रवासी भाड्याच्या रकमेच्या दहापट रक्कम भरण्याचे नाकारल्यास मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 च्या कलम 460 (ह) च्या अंतर्गत एक महिना पोलिस कोठडी किंवा 200 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होण्याची तरतूद आहे.
यामुळे बस प्रवाशांनी मानहानी आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी योग्य तिकीट किंवा वैध बसपास घेऊन तसेच तिकीट आणि बस पासवर असलेल्या प्रमाणित अंतरापर्यंतच प्रवास करावा, असे आवाहन बेस्टने केले.