रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर ब्लॉक

  Mumbai
  रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर ब्लॉक
  मुंबई  -  

  उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या दुरुस्ती, देखभालीच्या कामासाठी मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येईल, तर पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक असणार आहे.

  मध्य रेल्वे -
  मध्य रेल्वेच्या कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर सकाळी 11.15 ते संध्याकाळी 4.15 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉकदरम्यान कल्याण ते ठाणे मार्गावरील अप जलद वाहतूक अप धिम्या मार्गावरून चालवण्यात येईल. परिणामी या लोकल गाड्या 20 मिनिटे उशिराने धावणार आहेत. डाऊन जलद मार्गावरील लोकल गाड्यांना सकाळी 10.08 ते दुपारी 2.42 या वेळेत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबतील. त्यामुळे या गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने धावतील. ब्लॉकदरम्यान अप मार्गावरील 40104 रत्नागिरी-दादर ही पॅसेंजर ट्रेन दिवा स्थानकापर्यंतच चालवण्यात येणार असून तेथूनच डाऊन दिशेला 50103 दादर-रत्नागिरी ही पॅसेंजर ट्रेन रवाना होणार आहे.

  हार्बर रेल्वे -
  हार्बर रेल्वेच्या कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन या दोन्ही मार्गांवर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यत दुरुस्तीची कामे केली जातील. ब्लॉकदरम्यान हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील गाड्यांची वाहतूक सकाळी 10.20 ते दुपारी 3.48 वाजेपर्यंत कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान बंद राहणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल स्थानकांदरम्यान विशेष लोकल ट्रेन चालवण्यात येईल. ब्लॉकदरम्यान हार्बर मार्गावरील प्रवासी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ट्रान्सहार्बर आणि मेनलाईनने प्रवास करू शकतात.

  'परे'चा जम्बोब्लॉक
  पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी बोरिवली ते नायगाव स्थानकांदरम्यान जम्बोब्लॉक असणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धिम्या मार्गावर दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. ब्लॉकदरम्यान विरार-वसई रोड ते बोरीवली-गोरेगाव स्थानकादरम्यानची अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील वाहतूक अप आणि डाऊन जलद मार्गावरुन चालवण्यात येईल तर, ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील काही लोकल गाड्या रद्द करण्यात येतील.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.