आता काळ्या-पिवळ्या टॅक्सीचेही होणार घरबसल्या बुकिंग!

  Mumbai
  आता काळ्या-पिवळ्या टॅक्सीचेही होणार घरबसल्या बुकिंग!
  मुंबई  -  

  मुंबईत ओला आणि उबर टॅक्सीप्रमाणेच काळ्या पिवळ्या टॅक्सींसाठीही मोबाईल अॅप तयार करण्यात आले आहे. काळी-पिवळी टॅक्सी आमची ड्राईव्ह या अॅपचे येत्या 1 जूनला शुभारंभ होणार आहे.

  ओला-उबरच्या गारेगार सेवा येण्यापूर्वी काळी-पिवळी टॅक्सी अनेकांचा आधार होती. मात्र काळया पिवळ्या टॅक्सी चालकांच्या मनमानी कारभारामुळे त्रासलेल्या प्रवाशांनी खासगी ओला उबरला पसंती दिली. त्यामुळे काळ्या-पिवळ्या टॅक्सी चालकांच्या व्यवसायावर संक्रांत आली. आपला धंदा टिकवण्यासाठी मुंबई टॅक्सी मेन्स युनियन पुढे सरसावली आहे. बंगळुरू स्थित सन टेलिमॅटिक्स या कंपनीने मुंबईतील काळ्या पिवळ्या टॅक्सींसाठी 'आमची ड्राईव्ह' हे अॅप तयार केले आहे. विशेष म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषेत ते उपलब्ध असेल. ओला-उबरपेक्षा तुलनेने कमी दरात या अॅपचा उपयोग करून घरबसल्या टॅक्सी बुक करता येणार आहे. मुंबईत सुमारे 40 हजार टॅक्सीचालक असून या सर्व टॅक्सीचालकांना मे महिन्यात या अॅपचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येकी 25 जणांच्या एका बॅचमध्ये हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. वातानुकूलित आणि बिगर वातानुकूलित अशा दोन्ही सेवा यापुढे काळ्या पिवळ्या टॅक्सीच्या माध्यमातून मिळणार आहे.

  या अॅप निर्मितीचा संपूर्ण खर्च सन टेलिमॅटिक्स कंपनीने उचलला असून आम्ही प्रवाशांना ओला उबरच्या तुलनेत अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करणार आहोत. बिगर वातानुकूलित टॅक्सीसाठी प्रति किलोमीटर 14 ते 15 रुपये तर वातानुकूलित टॅक्सीसाठी प्रवाशांना प्रति किलोमीटर 16 रुपये मोजावे लागणार आहेत. तसेच हे अॅप टॅक्सीचालकांना मोफत डाऊनलोड करता येणार असून प्रवाशांना अॅप डाऊनलोड करण्यासाठी 5 रुपये सेवा कर लागणार आहे. 1 जूनपासून जवळपास 2 हजार टॅक्सी या अॅपद्वारे मुंबईकरांच्या सेवेत येणार आहेत. गारेगार ओला-उबरला नॉन एसी काळी-पिवळी टॅक्सी टक्कर देईल.

  - ए. एल. क्वाड्रोस, सरचिटणीस, मुंबई टॅक्सी मेन्स युनियन

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.