Advertisement

बोरिवली-सीएसएमटी लोकल प्रवास लवकरच होणार सुरू

पश्चिम रेल्वेच्या बोरीवली स्थानकातून मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं पोहोचता येणार आहे.

बोरिवली-सीएसएमटी लोकल प्रवास लवकरच होणार सुरू
SHARES

मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेच्या बोरीवली स्थानकातून मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं पोहोचता येणार आहे. हार्बर मार्गाच्या विस्तारीकरणाचं काम नव्या वर्षाच्या मुहूर्तावर सुरू करण्यात येणार आहे. सध्या बोरिवलीहून सीएसएमटी इथं पोहोचण्यासाठी माहीम किंवा दादरला उतरावे लागते. गोरेगाव-माहिमवरून हार्बरमार्गे आणि दादरवरून मध्य रेल्वे मार्गे सीएसएमटीला पोहोचता येते.

जागेची अडचण असल्यानं मालाड स्थानक उन्नत बनवण्याचा निर्णय घेण्यात आला असून गोरेगाव ते कांदिवलीदरम्यान सुमारे ३ किमीचा मार्गही उन्नत असणार आहे. उर्वरित मार्ग जमिनीला समांतर असणार आहे. गोरेगाव ते बोरिवलीदरम्यान हार्बर मार्गावर रुळ उभारण्यासाठी पूर्व तयारी म्हणून 'अलायनमेंट सर्वेक्षण' सुरू आहे.

ड्रोन तसंच आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी निविदेतून १८ पैकी १३ सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्पातील जमीन, झाडे, जमिनीखाली १.५ मीटर खोल वापरात असलेल्या विविध पाइपलाइन यांचं सर्वेक्षण करण्याचे काम सध्या सुरू आहे.

सद्यस्थितीत असलेल्या रेल्वे रुळांच्या शेजारी नवे रूळ टाकण्यासाठी जागेची प्रचंड अडचण आहे. सर्वक्षणाअंती कोणत्या स्थानकादरम्यान किती जागेची आवश्यकता आहे, उन्नत मार्गासाठी जागेची गरज याची तपशीलवार माहिती मिळेल, त्यानुसार निविदा मागवून कामे सुरू करण्याचे नियोजन असल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले.

मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) मुंबई शहरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी) ३ अ मध्ये गोरेगाव ते बोरिवली (७.८ किमी) असा हार्बर विस्तारीकरणाचा प्रकल्प मांडण्यात आला. एप्रिल २०१९ मध्ये रेल्वे मंडळाने याला मंजुरी दिली. गोरेगाव ते हार्बर विस्तारीकरण प्रकल्पाचा अपेक्षित खर्च ७४५.३१ कोटी इतका आहे. याचबरोबर मध्य आणि पश्चिम रेल्वेसाठी स्टेबलिंग मार्गही उभारण्यात येणार असून याचा खर्च ४८५ कोटी इतका आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा