शुक्रवार ठरला रेल्वेचा बिघाडवार!

  Mumbai
  शुक्रवार ठरला रेल्वेचा बिघाडवार!
  मुंबई  -  

  ऐन गर्दीच्या वेळेत हार्बरपाठोपाठ मध्य रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झाल्याने शुक्रवारी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मानखुर्द-चेंबूर रेल्वे स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने हार्बर रेल्वे विस्कळीत झाली होती. त्यामुळे हार्बर मार्गावरील गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत होत्या.

  मध्य रेल्वे मार्गावर घाटकोपरहून ठाण्याकडे जाणारी वाहतूक बराच काळ खोळंबली होती. या मार्गावरील तांत्रिक बिघाड दूर केल्यानंतर धिम्या मार्गावरील वाहतूक सुरू झाली. परंतु ठाण्याच्या दिशेने जाणारी जलद मार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प होती.

  मानखुर्द-चेंबूर दरम्यान ओव्हरहेड वायरला बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडीत झाला होता. यामुळे या मार्गावरील लोकलही खोळंबल्या होत्या. या प्रकारामुळे रेल्वेच्या वेळापत्रकाचे तीनतेरा वाजल्याचंच चित्र पहायला मिळालं.

  रेल्वे रुळाला तडा जाणे, कधी ओव्हरहेड वायर तुटणे, तर कधी सिग्नल यंत्रणेत बिघाड होणे हे रेल्वेचे रोजचे रडगाणे आहे. प्रवाशांना नाईलाजास्तव सर्व मनस्ताप सहन करावा लागत आहे, अशी प्रतिक्रिया रेल्वे प्रवासी संघटनेच्या सदस्या वंदना गायकवाड यांनी दिली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.