Advertisement

हार्बरवर येणार सिमेन्सच्या ३ लोकल

मध्य रेल्वेच्या ताफ्यात एक बंबार्डिअर लोकल असून आणखी २ बंबार्डिअर लोकल पुढील १५ दिवसांत येणं अपेक्षित आहे. या लोकल आल्यावर मध्य रेल्वेच्या ३ सिमेन्सच्या लोकल हार्बर मार्गावर आणण्यात येतील.

हार्बरवर येणार सिमेन्सच्या ३ लोकल
SHARES

मुंबईतील हार्बर मार्गावर लवकरच सर्वच्या सर्व सिमेन्सच्या लोकल धावणार आहेत. सध्या हार्बरवर ४ जुन्या रेट्रोफिटेड लोकल धावत आहेत. या लोकल कमी उंचीच्या असून जागेच्या बाबतीत सिमेन्सपेक्षा तोकड्या आहेत. त्यामुळे गर्दीच्या वेळेस तसंच पावसाळ्यात या लोकलमधील प्रवाशांचे चांगलेच हाल होतात. 

४ जुन्या लोकल

हार्बर मार्गावर सध्या ४० लोकल धावत असून त्यातील ३६ लोकल सिमेन्सच्या, तर ४ लोकल जुन्या रेट्रोफिटेड आहेत. या ४० लोकल हार्बरवर दररोज ६१२ फेऱ्या करतात. मध्य रेल्वेच्या ताफ्यात एक बंबार्डिअर लोकल असून आणखी २ बंबार्डिअर लोकल पुढील १५ दिवसांत येणं अपेक्षित आहे. या लोकल आल्यावर मध्य रेल्वेच्या ३ सिमेन्सच्या लोकल हार्बर मार्गावर आणण्यात येतील.   

तांत्रिक बदल

हार्बर मार्गावरील या जुन्या रेट्रोफिटेड लोकल डायरेक्ट करंट (डीसी) पाॅवरवर धावणाऱ्या होत्या. हार्बर मार्गावरील विद्युत प्रवाह डायरेक्ट करंटमधून अल्टरनेट करंट (एसी) मध्ये परावर्तीत करण्यात आल्यावर या लोकलमध्ये तांत्रिक बदल करण्यात आले. तरीही या लोकलमधील जागेची अडचण दूर झालीच नाही. तसंच कमी उंचीमुळे दर पावसाळ्यात होणाऱ्या बिघाडामुळे हार्बर सेवा विस्कळीत होण्याचा सिलसिलाही कायम राहीला.  

प्रवाशांना त्रास

रुळावर साचलेल्या पाण्यातून या लोकल चालवल्यास या लोकलमध्ये बिघाड होतो. त्यामुळे या लोकल कारशेडमध्ये नेऊन त्या दुरूस्त कराव्या लागतात. या लोकलमध्ये वारंवार होणारे बिघाड आणि या लोकलचं संपलेलं वय लक्षात घेता मध्य रेल्वे मार्गावरील सिमेन्सच्या ३ लोकल हार्बर मार्गावर आणण्यात येणार आहेत. 

या लोकल हार्बरवर धावू लागताच येत्या पावसाळ्याआधी हार्बरवरील सर्व लोकल सिमेन्सच्या असतील, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. सिमेन्सच्या लोकल अधिक उंचीच्या तसंच जागेच्या बाबतीत जुन्या लोकलपेक्षा मोठ्या आकाराच्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना पावसाळ्या दरम्यान थोडाफार दिलासा मिळू शकेल.



हेही वाचा-

बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार ३ हजार भाड्याच्या बस?

'मेट्रो-३' च्या १.२४ किलोमीटर अंतराचं भुयारीकरण पूर्ण



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा