Advertisement

जगात सर्वाधिक ‘मेट्रो’ची कामं मुंबईतच सुरू!

पुढील ३ ते ४ वर्षे मुंबईसाठी महत्त्वाची असतील. सर्वसामान्य मुंबईकरांना परवडणाऱ्या घरांसोबत परवडणारी वाहतूक व्यवस्था देण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

जगात सर्वाधिक ‘मेट्रो’ची कामं मुंबईतच सुरू!
SHARES

भारतीय बनावटीचा पहिला मेट्रो डबा मुंबईत दाखल झाला असून महानगराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुसह्य होण्यासाठी पुढचं पाऊल पडलं आहे. पुढील ३ ते ४ वर्षे मुंबईसाठी महत्त्वाची असतील. सर्वसामान्य मुंबईकरांना परवडणाऱ्या घरांसोबत परवडणारी वाहतूक व्यवस्था देण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मेट्रो मार्गिका ७ व २ (अ) मार्गावरील पहिल्या मेट्रो कोचचं अनावरण, चारकोप मेट्रो डेपो संचलन आणि नियंत्रण केंद्र, ग्रहण उपकेंद्राचं उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबई मेट्रोची पहिली लाईन जूनपर्यंत सुरू होईल. कोस्टल रोड, मेट्रो या प्रकल्पांमुळे मुंबईला नियोजनबद्ध आखीवरेखीव स्वरूप देण्यात येत आहे. लोकलला मेट्रोचा पर्याय उपलब्ध होणार असल्याने उपनगरीय रेल्वे सेवेवरील ताण कमी होईल. मुंबईत मेट्रोची जेवढी कामे सुरू आहेत तेवढी जगात कुठेही सुरू नसतील. कुठल्याही विकासकामांना थांबवण्यात आलेलं नाही तर पूर्वीपेक्षा अधिक गती देताना जनतेला जे आवश्यक आहे ते देण्याचं काम सरकार करीत आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) म्हणाले, या मार्गावर मेट्रो चाचण्यांना सुरुवात होणार असून ४ महिन्यात या मार्गावर मेट्रो धावू लागतील. ३५ किमीचा हा मेट्रो मार्ग असून त्याद्वारे अंधेरी ते दहिसर पट्ट्यातील १३ लाख प्रवाशांना सेवा देण्यात येणार आहे. या दोन्ही मार्गावर मे २०२१ पर्यंत सेवा कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. २०२६ पर्यंत मुंबईतील मेट्रो मार्गांचं काम पूर्ण करण्याचं प्रस्तावित असून त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश परिसरात वर्तुळाकार मेट्रो मार्ग तयार होतील. साधारणतः २०३१ पर्यंत १ कोटी प्रवासी मेट्रोने प्रवास करतील, असा अंदाज असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

हेही वाचा- स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ‘बेस्ट’ ला काळानुरुप बदलावं लागेल- उद्धव ठाकरे

प्रकल्पाची वैशिष्ट्ये:

  • मुंबई मेट्रो (mumbai metro) लाईन २ ए (दहिसर पूर्व ते डी.एन. नगर) आणि लाईन ७ (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) साठी वापरण्यात येणारा भारतीय बनावटीचा पहिला मेट्रो कोच मुंबईत दाखल.
  • या दोन्ही मेट्रो मार्गावर नियंत्रण ठेवणे आणि एकात्मिक कृतींसाठी चारकोप आगार विकसित.
  • मेट्रो चाचणी मार्चपासून सुरू होईल आणि ती पुढे महिनाभर सुरू राहील. त्यानंतर मेपासून मेट्रो मार्गाचे प्रत्यक्ष व्यावसायिक कामकाज सुरू होईल.
  • चालकविरहीत ट्रेनशी अनुकूलता
  • ऊर्जा वाचविणारी पुनरुत्पादक ब्रेक सिस्टम
  • प्रत्येक बाजूला चार दरवाजे असलेली स्टेनलेस स्टील बॉडी.
  • विकसित देशातील शहरांप्रमाणे या नवीन कोचमधून प्रवाशांना त्यांच्या सायकलसह प्रवास करता येऊ शकेल.

मेट्रो लाइन २ ए : दहिसर पूर्व ते डीएन नगरला जोडणाऱ्या १८.५ किमी लांबीच्या मेट्रो लाईन २ ए च्या बांधकामासाठी ६,४१० कोटी रुपये खर्च होत आहे. यात आनंद नगर, रुषी संकुल, आयसी कॉलनी, एकसर, डॉन बॉस्को, शिंपोली, महावीर नगर, कामराज नगर, चारकोप, मालाड मेट्रो, कस्तुरी पार्क, बांगूर नगर, गोरेगाव मेट्रो, आदर्श नगर, शास्त्री नगर आणिडीएन नगरही १६ स्थानके असतील.

मेट्रो लाइन ७ : अंधेरी पूर्व आणि दहिसर पूर्वेला जोडणारी १६.४७५किमी लांबीची मेट्रो लाइन ७ ही ६.२०८ कोटी रुपये खर्चून बांधली जात आहे. यामध्ये दहिसर (पूर्व). ओवरीपाडा, नॅशनल पार्क, देवीपाडा, मागाठाणे, महिंद्रा अँड महिंद्रा, बाणडोंगरी, पुष्पा पार्क, पठाणवाडी, आरे, महानंद, जेव्हीएलआर जंक्शन, शंकरवाडी, अंधेरी (पूर्व) अशी १३ स्थानके असतील.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा