Advertisement

स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ‘बेस्ट’ ला काळानुरुप बदलावं लागेल- उद्धव ठाकरे

स्पर्धेत टिकून राहण्यासाठी पर्यायी मार्गांचा विचार करतानाच बेस्टच्या आधुनिकीकरणासाठी सरकारकडून सर्व प्रकारची ताकद दिली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं.

स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ‘बेस्ट’  ला काळानुरुप बदलावं लागेल- उद्धव ठाकरे
SHARES

मुंबईत मेट्रोसह विविध वाहतूक सेवा सुरु होत असताना बेस्टला स्पर्धा निर्माण होत आहे. यात टिकण्यासाठी बेस्टला काळानुरुप बदलावं लागेल. इतर वाहतूक सेवा अणि बेस्टच्या सेवेत मुलभूत फरक आहे. बेस्ट गल्लीबोळात जाते. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी पर्यायी मार्गांचा विचार करतानाच बेस्टच्या आधुनिकीकरणासाठी सरकारकडून सर्व प्रकारची ताकद दिली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी दिलं. 

मुंबईतील वडाळा येथील बेस्ट उपक्रमाच्या अद्ययावत बस नियंत्रण कक्षाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आलं. या सोहळ्याला पर्यावरण, पर्यटन मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, बेस्ट उपक्रमाचे अध्यक्ष प्रविण शिंदे, अतिरिक्त आयुक्त पी.वेलारासू, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आपली बेस्ट प्रवासी सेवेमध्ये नावप्रमाणे बेस्ट आहे. ऊन, वारा, पाऊस असताना बेस्टचे कर्मचारी काम करतात. पावसाळ्यात इतर सेवा विस्कळीत होतात परंतू बेस्ट सुरु असते. कोरोना संकटाच्या काळात जग लॉकडाऊन असताना जीवनावश्यक कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी आपल्या हक्काची बेस्ट धावून आली. कोरोना (coronavirus) विरुद्धच्या युद्धात बेस्ट उपक्रमातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ‘बेस्ट’ योगदान दिलं. सध्या कोरोना संकटाच्या काळात लोकल अजून पूर्ण ताकदीने सुरु नाही. अशा परिस्थितीत प्रवासी सेवेचा मोठा भार बेस्टने उचलला आहे. त्यासाठी मुंबईकर कृतज्ञच राहतील. 

बेस्ट उपक्रमाचे कमांडिंग सेंटर ही अभिनव कल्पना आहे. या नियंत्रण केंद्रामुळे बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांना माहिती मिळणार आहे. त्यासाठीचे ॲप देखील उपयुक्त ठरेल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा- मुंबई महापालिकेत हेरिटेज वॉक सुरू, मुख्यालयाच्या इमारतीची सैर करण्याची संधी

अद्ययावत ‘बस नियंत्रण कक्ष’ 

  • बससेवेचं नियंत्रण करण्याकरिता वडाळा बस आगारात ’अद्ययावत बस नियंत्रण कक्षा’ची उभारणी.
  • नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून नियंत्रण वाहतूक विभाग, परिवहन अभियांत्रिकी विभाग तसंच स्थापत्य अभियांत्रिकी विभाग या सर्व विभागांच्या कामकाजाचं एकत्रिकरण 
  • ITMS – Intelligent Transport Management System -या संगणकीय प्रणालीद्वारे बसप्रवर्तनाचं नियंत्रण 
  • मार्गावर प्रवर्तित होणाऱ्या बसगाड्यांचा मागोवा (Vehicle Tracking System)ठावठिकाणा नियंत्रण कक्षातून घेण्यात येईल.
  • मार्गावर कोणत्याही प्रकारचा अडचणीचा प्रसंग निर्माण झाल्यास त्याबाबत संबंधित यंत्रणांना सावध करुन अडचणीचं निराकरण करण्यात येईल.
  • बससेवेमध्ये अनियमितता असल्याचे निदर्शनास आल्यास तातडीने संबंधित विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात येतील.
  • प्रवाशांना उपक्रमाच्या बससेवेबाबत आवश्यकतेप्रमाणे माहिती पुरविण्यात येईल. (Toll Free Service)
  • नव्याने मुंबईत (mumbai) येणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या पुढील प्रवासाबाबत आवश्यक असलेले मार्गदर्शन करण्यात येईल
  • प्रवाशांच्या सोयीकरिता बेस्ट उपक्रमाने’बेस्ट प्रवास अॅप’सुरु केलेले असून या अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना त्यांच्या अपेक्षित बसमार्गाबाबत संपूर्ण माहिती उपलब्ध होते. बसगाडीची बसथांब्यावर येण्याची अचूक वेळ बसगाडीचे सध्याचे ठिकाण ही माहिती उपलब्ध होते तसेच प्रवाशांना मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी प्रवासाकरिता कोणते बसमार्ग उपलब्ध आहेत, यासंबंधी माहिती देखील अॅपवर उपलब्ध आहे.
  • अपघात घडल्यास बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांसह पोलीस,अग्निशमन दल, महापालिका अशा संबंधित यंत्रणांना तातडीने माहिती उपलब्ध करुन जखमी प्रवाशांना तात्काळ औषधोपचार उपलब्ध होतील, याची खबरदारी घेण्यात येईल.
  • नैसर्गिक आपत्ती,उपनगरीय रेल्वेसेवा विस्कळीत होणे,अशा वेगवेगळ्या आपत्कालिन परिस्थितीमध्ये आवश्यक असलेली मदत तात्काळ उपलब्ध करुन देण्याकरिता नियंत्रण कक्षामधून जलदगतीने कार्यवाही करण्यात येईल.

(maharashtra cm uddhav thackeray reacts on best bus modernization)

हेही वाचा- मुंबईला पाणी पुरवणाऱ्या जलवाहिन्यांना 'या' भागात धोका

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा