कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आलं. या लॉकडाऊनमुळं सर्वच सुविधा, वाहतूक सेवा बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळं अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा पुरविण्यासाठी बेस्टनं पुढाकार घेतला होता. परंतु, अनेक कर्मचाऱ्यांनी या कालावधीत सुरक्षेच्या दृष्टीनं घरी राहणं पसंत केलं. मात्र, बेस्ट उपक्रमानं लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा देण्याऐवजी गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई सुरुच ठेवली आहे.
कारवाईचा हा आकडा वाढतच असून आतापर्यंत १५९ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. लॉकडाऊनमध्ये ही बेस्ट उपक्रमानं परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी १०० टक्के उपस्थितीच्या सूचना केल्या होत्या. तर विद्युत विभागासह अन्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी १५ टक्केच उपस्थिती होती.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बससेवा देताना लॉकडाऊनमध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांची उपस्थिती गरजेची होती. परंतु अनेक कर्मचारी गैरहजर राहिले आणि मनुष्यबळाअभावी सेवा चालवताना बेस्टच्या नाकीनऊ आले. त्यामुळं गैरहजर कर्मचाऱ्यांना चार्जशीट देऊन कर्तव्यावर हजर राहण्याच्या सूचना केल्या. त्यानंतरही कामावर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करावी लागली.
या कारवाईत वाढ झाली असून, आता संख्या १५९ झाल्याचे समजतं. यामध्ये परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असून त्यापाठोपाठ अन्य विभागातील कर्मचारी आहेत.
हेही वाचा -
मुंबईत थेट विसर्जनाला बंदी, पालिकेनं दिले 'हे' पर्याय
वांद्रेत रिकामी इमारत घरावर कोसळली