कुर्ल्यातील तिकीटघराला गर्दुल्ले, भिकाऱ्यांचा विळखा

Kurla
कुर्ल्यातील तिकीटघराला गर्दुल्ले, भिकाऱ्यांचा विळखा
कुर्ल्यातील तिकीटघराला गर्दुल्ले, भिकाऱ्यांचा विळखा
See all
मुंबई  -  

मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकातील फलाट क्रमांक 1 ला लागून असलेल्या तिकीटघराच्या मोकळ्या जागेत भिकारी, गर्दुल्ले आणि भटक्या कुत्र्यांचा वावर दिवसेंदिवस वाढायला लागला आहे. परिणामी तिकीटघरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून येथे तिकीट काढण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांना अस्वच्छता आणि दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांना वारंवार याप्रकरणी तक्रार करूनही ते याकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.

कुर्ला स्थानकातील मध्य व हार्बर अशा दोन्ही मार्गांवरील फलाटांवर प्रवाशांची मोठी वर्दळ असते. दिवसाला हजारो प्रवासी तिकीट काढण्यासाठी फलाट क्रमांक 1 ला लागून असलेल्या तिकीटघराचा वापर करतात. मात्र या तिकीटघरातील मोकळ्या जागेचा ताबा भिकारी, गर्दुल्ले आणि भटक्या कुत्र्यांनी घेतल्याने प्रवाशांना रांगा लावणेही मुश्कील होते.

हे भिकारी व गर्दुल्ले तिकीट काढण्यासाठी आलेल्या प्रवाशांकडे पैशांची मागणी करतात. पैसे न दिल्यास भिकाऱ्यांची मुले पैसे मागत प्रवाशांच्या मागे लागतात. रात्रीही हे भिकारी तेथेच झोपतात. भिकारी आणि गर्दुल्ले येथेच बसून खाणे-पिणे करतात. उरलेले अन्न तिथेच टाकतात. भिकाऱ्यांची लहान मुले अनेकदा नैसर्गिक विधीही येथेच उरकतात. अत्यंत दुर्गंधीचा सामना करत प्रवाशांना तिकीट काढावे लागते. रेल्वे प्रशासन व रेल्वे पोलिसांकडे यासंदर्भात तक्रारी करूनही ते याप्रश्नी दुर्लक्ष करीत असल्यानेच या स्थानकाचे विद्रुपीकरण होऊ लागल्याचा प्रवाशांचा आरोप आहे.

कुर्ला स्थानकातील तिकीट खिडकीजवळ प्रवाशांनी तिकीट काढल्यानंतर उरलेले सुट्टे पैसे भिकाऱ्यांच्या हातात टेकवावे लागतात अन्यथा या भिकाऱ्यांची छोटी मुले आपल्या मागून स्थानकात येतात. आपण केलेल्या दुर्लक्षामुळे ही मुले गर्दीच्या वेळी प्रवाशांच्या पायाखाली किंवा स्थानकात येणाऱ्या लोकलखाली येऊ नये या भितीने त्यांना पैसे देऊन पुढे निघून जाणे योग्य वाटते.
- विदेश सिंग, प्रवासी (चेंबूर)

गर्दुल्ल्यांमुळे तिकीट खिडकीजवळ जाणे असुरक्षित वाटते. त्यात आपल्याजवळ जास्त सामान असेल तर ते त्या सामनाजवळ फिरकत राहतात, याची भीती वाटते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हे तिकीटघर गर्दुल्ले, भिकारी आणि भटक्या कुत्र्यांच्या विळख्यातून मोकळे करणे गरजेचे आहे.
- ऋतुजा घाणेकर, प्रवासी (मुलूंड)

याबाबत मध्य रेल्वेचे जनसपंर्क अधिकारी ए. के. सिंग यांच्याशी चर्चा केली असता संबंधित अधिकाऱ्यांना कुर्ला पश्चिमेकडील तिकीटघराची पाहणी करून तेथील भिकारी, गर्दुल्ले तसेच भटके कुत्रे हटविण्यास सांगण्यात येईल, असे सिंग यांनी स्पष्ट केले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.