Advertisement

‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास’मुळे तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी


‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास’मुळे तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी
SHARES

अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांबरोबरच आता कोरोना प्रतिबंधक लसीचे २ डोस घेतलेल्या व दुसरा डोस घेऊन १४ दिवस झालेल्या सामान्य नागरिकांसाठीही राज्य शासनातर्फे रेल्वे ई-पास (युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास) सुविधा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा सुरू होताच शुक्रवारी रेल्वे स्थानकात लसीकरण पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून पास घेणाऱ्यांची संख्या काहीशी घटली होती. त्यामुळे तिकीट खिडक्यांवरील गर्दीही कमी झालेली दिसली.

लसीचे २ डॉस घेऊन १४ दिवस उलटून गेलेल्या सामान्य प्रवाशांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची परवानगी दिल्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील सर्व स्थानकांत लोकलचा एक महिन्याचा पास उपलब्ध करून देण्यात येत आहे. राज्य शासनाची लोकल प्रवासासाठीची ई-पास सुविधाही शुक्रवारपासून सुरू झाली आहे.

राज्य शासनाने दिलेल्या संकेतस्थळावरील नोंदणीनंतर मिळालेला ई-पास मोबाइलमध्ये जतन करून तो रेल्वे स्थानकातील तिकीट खिडक्यांवर सादर केल्यावर नागरिकांना मासिक प्रवास पास देण्यात येत आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या आकडेवारीनुसार, १२ ऑगस्टला सकाळी ७ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत १४,६८८ पासची विक्री झाली होती. यात डोंबिवली स्थानकातून १ हजार ३३ पास, कल्याणमधून ८८८ आणि ठाणे स्थानकातून ६६१ पास काढले गेले होते. १३ ऑगस्टला याच वेळेत १२,३२३ पासची विक्री झाली. डोंबिवलीतून ९४५, कल्याणमधून ७६४ आणि ठाणे स्थानकातून ५४५ पास काढले गेले.

पश्चिम रेल्वेवरही १२ ऑगस्टला सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत ४,७५५ पासची विक्री झाली असून यात बोरीवली स्थानकातून ४९६ पास आणि भाईंदर स्थानकातून ३२३ पासची विक्री झाली तर १३ ऑगस्टला याच वेळेत ३,८३० पास देण्यात आले. यात बोरीवलीतून ४३३ व भाईंदरमधून २७६ पास काढले गेले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा