Advertisement

दादर स्थानकात लोकलच्या डब्याला आग, जिवीतहानी नाही!


दादर स्थानकात लोकलच्या डब्याला आग, जिवीतहानी नाही!
SHARES

मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील ठाण्याकडे जाणाऱ्या धीम्या लोकलला 9. 22 वाजता आग लागली. ही आग तात्काळ विझवण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या आगीत कुठल्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. मात्र, या आगीमुळे मागच्या लोकल अर्धा तास खोळंबल्याने ऐन गर्दीच्या वेळी घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले.


नेमकं काय झालं?

शुक्रवारी २ फेब्रुवारीला रात्री नेहमीप्रमाणे मुंबईकर आपल्या कामावरून परतत होते. दादर स्टेशनवर प्लॅटफॉर्म नंबर १ आणि २ वरून कल्याण, कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या लोकल नेहमीप्रमाणे एकामागून एक जात होत्या. प्लॅटफॉर्म नंबर १ वरून ९ वाजून २ मिनिटांची ठाण्याकडे जाणारी लोकल उशिराने निघाली. प्लॅटफॉर्म सोडताच अवघ्या काही सेकंदांमध्येच ट्रेनच्या मध्यभागी असलेल्या डब्यामधून आधी गोंधळ आणि नंतर धूर दिसू लागला.

लोकलच्या ३६९बी या डब्याला आग लागली होती. आतल्या प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवून लागलीच ट्रेन थांबवली. आणि ट्रेन रिकामी करायला सुरुवात केली. एव्हाना जीआरपीचे अधिकारी आणि जवान घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनीही तातडीनं प्रवाशांना खाली उतरवलं. दरम्यान, अग्निशमन दलाचे जवानही तिथे दाखल झाले होते.

सुमारे ९.४५च्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवायला सुरुवात केली. एका तासामध्ये म्हणजेच १०.४५च्या सुमारास ही आग विझवण्यात अग्निशमन विभागाच्या जवानांना यश आलं. पुढच्या अर्ध्या तासाच आग लागलेल्या डब्याच्या कुलिंगचं काम करण्यात आलं. आणि ११.३०च्या सुमारास मोहिम फत्ते झाल्याचं अग्निशमन विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं.

सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. डब्यातल्या प्रवाशांनी वेळीच सतर्क होत डबा रिकामा केला. तसेच, इतर डब्यांमधूनही सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात आले होते.

दरम्यान, सुमारे दोन तास ही ट्रेन खोळंबल्यामुळे दादरच्या प्लॅटफॉर्म नंबर १ आणि २ वरची वाहतूक पूर्णपणे बंद होती. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. रात्री ११.४५ वाजता ही ट्रेन ट्रॅकवरून हलवण्यात आली.

आम्हाला आगीची माहिती मिळताच १० फायर इंजिन घटनास्थळी दाखल झाले. दोन वॉटर लाईनचा वापर करून आम्ही ही आग विझवली. यामध्ये कोणतीही जिवितहानी झालेली नसून तासाभरात आग नियंत्रणात आणण्यात आली.

एस. बी. दराडे, विभागीय अग्निशमन अधिकारी
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय