Advertisement

मुंबईतील पाच एसटी बस थांबे कात टाकणार

दादर एशियाड बसस्थानकाचा कायापालट केल्यानंतर आता एसटीनं आपला मोर्चा मुंबईतील इतर पाच एसटी बस थांब्याकडे वळवला आहे. त्यानुसार लवकरच मुंबईतील आणखी पाच बस स्थानकांचं रूप पालटण्यात येणार असल्याची माहिती यावेळी रावते यांनी दिली आहे.

मुंबईतील पाच एसटी बस थांबे कात टाकणार
SHARES

दादर पूर्व येथील एशियाड एसटी बस स्थानकाचा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा (एसटी) ने कायापालट केला आहे. अत्यंत देखणं असं बसस्थानक एसटीकडून उभारण्यात आलं असून हे बसस्थानक मंगळवारपासून सेवेत दाखल झालं आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते मंगळवारी या नव्या बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे.

दादर एशियाड बसस्थानकाचा कायापालट केल्यानंतर आता एसटीनं आपला मोर्चा मुंबईतील इतर पाच एसटी बस थांब्याकडे वळवला आहे. त्यानुसार  लवकरच मुंबईतील आणखी पाच बस स्थानकांचं रूप पालटण्यात येणार असल्याची माहिती यावेळी रावते यांनी दिली आहे.


अत्याधुनिक, आकर्षक बसस्थानक 

१४ एप्रिल १९८३ पासून सुरू झालेल्या दादर येथील दादर-पुणे निमआराम एशियाड बस स्थानकाची नुकतीच एसटीकडून नव्यानं बांधणी करण्यात आली आहे. अत्याधुनिक आणि आकर्षक असं हे बसस्थानक मंगळवारपासून दादर-पुणे स्टेशन या मार्गावरील हिरकणी बस प्रवाशांसाठी खुलं झालं आहे. आधी हे बसस्थानक म्हणजे छोटेखानी प्रवासी प्रतिक्षालय होतं. मात्र गेल्या काही वर्षांपासून या बस स्थानकावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांची छोटेखानी प्रतिक्षालयात मोठी गैरसोय होत  होती.


५१ लाखांचा खर्च

ही बाब लक्षात घेत एसटीनं या बस स्थानकाचं नव्यानं बांधकाम करत मोठं बस स्थानक बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रशस्त प्रतिक्षालय, चालक-वाहकांसाठी विश्रांतीगृह, संगणकीयकृत आरक्षण कक्ष, प्रवाशी-कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छ-शुद्ध पाणी पुरवठा अशा अनेक गोष्टींचा समावेश असलेलं आकर्षक बस स्थानक एसटीनं उभारलं आहे. या बस स्थानकाच्या उभारणीसाठी एसटीकडून ५१ लाख ४५ हजार २३३ रुपये इतका खर्च करण्यात आला आहे.


थांब्यांची नव्यानं बांधणी

दादर बस स्थानकानंतर आता मुंबईतील आणखी पाच बस थांब्याचीही नव्यानं बांधणी करण्यात येणार आहे. यात दादर पश्चिम, सायन (शीव), मैत्रीपार्क, स्वस्तिक पार्क आणि एव्हराड नगर (चुनाभट्टी) या पाच एसटी बस थांब्याचा समावेश आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील बस थांब्यांचाही एसटीकडून कायापालट केला जाणार आहे. राज्यभर ४ हजार ५०० एसटी बस थांबे असून यातील सुमारे १ हजार बस थांब्यांची नव्यानं बांधणी करण्यात येणार असल्याचंही रावते यांनी सांगितलं आहे.



हेही वाचा -

बोईसर-दिवा मेमू १५ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत

दिवाळीनिमित्त मध्य रेल्वेच्या ३८ विशेष गाड्या




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा