Advertisement

आयसीआयसीआय बॅंकेचा बेस्टसोबत असलेला 'हा' करार संपुष्टात

आयसीआयसीआय बँकेने बेस्टसोबत मागील १० वर्षे असलेला करार संपुष्टात आणला आहे.

आयसीआयसीआय बॅंकेचा बेस्टसोबत असलेला 'हा' करार संपुष्टात
SHARES

बेस्टनं प्रवाशांच्या संख्येत झालेली घट भरून काढण्यासाठी तिकीट दरात (Ticket Rates) कपात केली. त्यानुसार, प्रवाशांना किमान प्रवासासाठी ५ रुपये आणि एसी बसच्या किमान प्रवासासाठी ६ रुपये मोजावे लागणार आहेत. तिकीट दरात कपात केल्यानं बेस्टकडं मोठ्या प्रमाणात चिल्लर (Coins) जमा झाली आहे. या चिल्लर कमी करण्यासाठी बेस्टनं ही चिल्लर सर्व बसडेपोंमध्ये सुट्ट्यांची निकड असलेल्यांसाठी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला. तसंच, प्रवाशांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मात्र, आयसीआयसीआय बँकेने (ICICI Bank) बेस्टसोबत मागील १० वर्षे असलेला करार संपुष्टात आणला आहे.

तिकीट दर कपातीनंतर बेस्टकडे मोठ्या प्रमाणावर जमणारी नाणी हाताळणे शक्य नसल्यानं आयसीआयसीआय बँकेने बेस्टसोबतचा करार संपुष्टात आणला आहे. त्यामुळं बेस्टच्या परिवहन आणि वीजपुरवठा विभागात जमा होणारी दररोजची ४ कोटी रुपये रोख रक्कम आणि ८ कोटी रुपये धनादेश असे १२ कोटी रुपयांच्या व्यवस्थापनाचा प्रश्न बेस्टला सतावत आहे.

बेस्टच्या परिवहन आणि वीजपुरवठा सेवेतून जमा होणारी रक्कम गोळा करण्याचं काम आयसीआयसीआय बँक मागील १० वर्षे करते आहे. त्यात धनादेशांचाही समावेश आहे. मुंबईतील १२० ठिकाणाहून ती रक्कम जमा केली जात होती. हे पैसे सात दिवसांनी आयसीआयसीआय बँक बेस्टच्या खात्यात जमा करत होती. त्यामुळं बँकेला ७ दिवस बेस्टचे पैसे वापरण्यासाठी मिळत होते.

९ जुलै २०१९ पासून भाडेकपात होताच बेस्टची प्रवासी संख्या वाढली. बेस्टचा महसूल यात कमी झाला. त्यात बेस्टच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात नाणी जमा होऊ लागली. मोठ्या प्रमाणावर जमा होणारी नाणी बँकेत जमा करताना चांगलेच नाकीनऊ येत होते. त्यामुळं बँकेनं यातून माघार घेतली होती. त्यानंतर बेस्ट उपक्रम व बँकेत झालेल्या चर्चेनंतर पुन्हा सेवा सुरू झाली.

परंतु, आता पुन्हा आयसीआयसीआयनं माघार घेतल्याची माहिती मिळते. त्यामुळं दररोजची रक्कम गोळा करण्याचे मोठे आव्हान बेस्टसमोर असणार आहे. रक्कम जमा करण्यासाठी बेस्टला मनुष्यबळ, वाहन आदीची व्यवस्था पाहावी लागणार आहे. शिवाय त्यासाठीचा आर्थिक बोजाही सहन करावा लागणार आहे.

५ रुपये तिकीट झाल्यानंतर बेस्टच्या तिजोरीत आतापर्यंत ८ कोटी रुपयांपेक्षाही जास्त नाण्यांची भर पडली आहे. मोठ्या प्रमाणात येणाऱ्या सुट्ट्या नाण्यांचं करायचं काय, असा प्रश्न बेस्टला पडला आहे. बेस्टनं सामान्य प्रवाशांना शंभर आणि ५०० रुपयांच्या बदल्यात सुट्टी नाणी देण्याचा पर्यायही ठेवला होता.



हेही वाचा -

मुंबईच्या डबेवाल्यांना मिळणार हक्काचं घर

Best Of Luck: मंगळवारपासून सुरू होणार १०वीची परीक्षा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा