कर्नाटकच्या मंत्र्याने 'जय महाराष्ट्र' म्हणणाऱ्यांवर कारवाई करण्याचे वक्तव्य केल्यानंतर कर्नाटक-महाराष्ट्र वादात नवी ठिणगी पडली आहे. काही राजकीय पक्षांनी महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या एसटी बसवर 'जय महाराष्ट्र' लिहून या मंत्र्यांना आव्हान दिले. एसटीवर तात्पुरत्या स्वरूपात लिहिलेले हेच शब्द एसटी महामंडळाने आपल्या बोधचिन्हात समावून घेतले आहेत. राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते या नव्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.
एसटीच्या नव्या बोधचिन्हाखाली 'जय महाराष्ट्र' असे लिहिण्यात आले आहे. दिवाकर रावते यांनी महाराष्ट्राच्या सर्व एसटी बसवर 'जय महाराष्ट्र' लिहिणार अशी घोषणा केली होती. त्यानुसार परिवाहन खात्याने 'जय महाराष्ट्र' असलेले नवे बोधचिन्ह प्रकाशित केले आहे. शुक्रवारी सकाळी 9 वाजता बेळगावला जाणाऱ्या एसटीवर 'जय महाराष्ट्र' असे लिहिलेले असेल.

महाराष्ट्राच्या अस्मितेचा मान राखण्यासाठी एसटीच्या बोधचिन्हात 'जय महाराष्ट्र' लिहिण्यात आल्याचे दिवाकर रावते यांनी सागितले. बेळगावच्या दिशेने जाणाऱ्या या एसटीचे स्वागत करण्यासाठी सांगली, सातारा भागातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे समजते. या गाडीला हिरवा कंदील दाखविण्यासाठी रावते स्वतः आगारात हजर राहण्याचीही शक्यता आहे.
हेही वाचा
एसटीत 450 महिला चालक -
नवीन भरती प्रक्रियेतून 450 महिला चालक सामील करून घेण्यात येणार असल्याचे रावते यांनी स्पष्ट केले. या पद्धतीने पहिल्यांदाच महिला चालक सेवेत येणार असल्याचे त्यांनी सांगितले. एसटीच्या काही मार्गांवर वेळापत्रकात बदल करण्याचे धोरण स्वीकारण्यात आल्याने प्रवासी संख्येत वाढ झाल्याचाही दावा केला आहे. यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष-व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल, महामंडळाचे महाव्यवस्थापक कॅ. विनोद रत्नपारखी, आर. आर. पाटील आदी उपस्थित होते.
