Advertisement

एसटीचे आरक्षण रद्द केल्यास तिकिटाची निम्मी रक्कम कापणार


एसटीचे आरक्षण रद्द केल्यास तिकिटाची निम्मी रक्कम कापणार
SHARES

आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी एसटी महामंडळाकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महामंडळाने आता आरक्षण रद्द करणाऱ्या प्रवाशांच्या तिकिटाच्या परताव्यात फेरबदल केले आहेत. नव्या बदलानुसार आता एसटी प्रवाशांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे.

राज्याच्या ग्रामीण भागाची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या एसटीला चाकरमान्यांची पहिली पसंती असते. तिकिटांचे आरक्षण करून आरामदायी प्रवास करण्याकडे बहुतांश प्रवाशांचा कल असतो. मात्र काही वेळेस प्रवाशांना आपला प्रवासाचा बेत अचानक रद्द करावा लागल्याने तिकीट रद्द करावे लागते. पूर्वी तिकीट रद्द करताना एसटीकडून नाममात्र रक्कम कापून परतावा दिला जायचा. मात्र नव्या बदलानुसार बस फेरी सुटण्याच्या नियोजित वेळेच्या 4 तासापर्यंत तिकीट रद्‌द केल्यास एसटीकडून 50 टक्‍के प्रवास भाडे कापले जाणार आहे. परताव्याच्या दरात अन्य बदलही महामंडळाकडून करण्यात आले असून यासंदर्भात 29 मे रोजी एसटी महामंडळाकडून आदेश काढण्यात आले आहेत.

गणपती, होळी किंवा इतर सणासुदीच्या काळात प्रवासी रेल्वेसोबतच एसटीचे तिकीट आरक्षित करून ठेवण्याला प्राधान्य देतात. रेल्वेचे तिकीट वेटिंगवर असल्यास एसटीने आरामात प्रवास करता येईल, असा उद्देश त्यामागे असतो. मात्र रेल्वेचे तिकीट नक्की झाल्यास एसटीचे आरक्षण रद्द करण्यात येते. यामुळे एसटी महामंडळाच्या तोट्यात भरच पडते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी एसटी महामंडळाने आरक्षण परताव्याच्या दरात मोठे बदल केले आहेत.

यापूर्वी गाडी सुटण्याच्या नियोजित वेळेच्या 4 तास अगोदर तिकीट रद्‌द करण्यासाठी अर्ज केला असेल तर केवळ 5 रुपये कापून संपूर्ण प्रवास भाड्याची रक्‍कम प्रवाशांना परत केली जायची. मात्र आता त्याऐवजी 50 टक्‍के प्रवास भाडे कापण्यात येणार आहे. पूर्वी बस सुटण्याच्या नियोजित वेळेच्या अर्धा तासापर्यंत तिकीट रद्‌द करण्यासाठी अर्ज केल्यास प्रवास भाड्यातील 10 टक्‍के रक्कम कापून उर्वरीत रक्कम परत दिली जात होती. नव्या बदलानुसार 12 तासांपर्यंत तिकीट रद्‌द केल्यास 25 टक्‍के प्रवास भाडे कापण्यात येणार आहे.


हेही वाचा

1 जूनला साजरा होणार एसटी महामंडळाचा वर्धापन दिन


गाडी सुटण्याच्या नियोजित वेळेच्या 30 मिनिटांअगोदर व प्रत्यक्षात गाडी सुटल्यानंतर दोन तासांपर्यंत तिकीट रद्‌द करण्यासाठी अर्ज केला, तर 50 टक्‍के परतावा देण्यात येत होता. आता 24 तासांअगोदरपर्यंत तिकीट रद्‌द केल्यास 10 टक्‍के प्रवास भाडे कापण्यात येणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लागण्यासोबतच प्रवाशांची संख्याही रोडावण्याची शक्यता आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा