Advertisement

पश्चिम रेल्वेच्या 'या' स्थानकांना मिळणार नवी झळाळी

पश्चिम रेल्वेवरील ऐतिहासिक स्थानक असलेल्या महालक्ष्मी व चर्नी रोड स्थानकाला नवी झळाळी मिळणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या 'या' स्थानकांना मिळणार नवी झळाळी
SHARES

पश्चिम रेल्वेवरील ऐतिहासिक स्थानक असलेल्या महालक्ष्मी व चर्नी रोड स्थानकाला नवी झळाळी मिळणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदाराची नियुक्तीही करण्यात आली असून या प्रकल्पामध्ये स्थानक इमारतीच्या पुनर्बाधणीसह प्रवाशांना अन्य सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. सध्या कोरोना संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या कडक र्निबधांमुळं दोन्ही स्थानकांच्या पुनर्बाधणीचं काम बंद असून, लवकरच ती पूर्णही करण्यात येणार आहेत.

आयआयटी, मुंबई या संस्थेतील तज्ज्ञांनी महालक्ष्मी रेल्वे स्थानकाची पाहणी केली होती. या पाहणीमध्ये महालक्ष्मी स्थानकातील उन्नत (एलिव्हेटेड) स्थानक इमारत धोकादायक असल्याचे निदर्शनास आले होते. तज्ज्ञांनी सादर केलेल्या अहवालात त्याचा उल्लेख केला होता. या इमारतीत तिकीट खिडकी सुविधा असून याच उन्नत इमारतीतून प्रवासी स्थानकात प्रवेश करतात. आयआयटी, मुंबईनं अहवाल सादर केल्यानंतर पश्चिम रेल्वेनं उन्नत स्थानक इमारतीची पुनर्बाधणी करण्याबरोबरच प्रवाशांना तेथे उत्तम सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.

चर्नी रोड स्थानकाचाही कायापालट करण्यात येणार आहे. या स्थानकातील इमारतीचं बांधकाम करण्यात येणार असून इथं नवीन तिकीट खिडकी सुविधा, एटीव्हीएमसाठी स्वतंत्र सेवा, स्टेशन मास्तर कार्यालय, मुख्य स्टेशन अधीक्षक कार्यालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. महालक्ष्मी स्थानकासाठी ३ कोटी ३२ लाख आणि चर्नी रोड स्थानकासाठी ५ कोटी ५१ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

यापैकी काही कामांना सुरुवातही झाली आहे. महालक्ष्मी स्थानकातील जुन्या तिकीट खिडक्या पाडून त्या जागी नवीन तिकीट खिडक्या उभारण्यात आल्या आहेत. या तिकीट खिडक्यांमधील अंतर्गत सजावट आणि अन्य कामे करण्यात येत आहेत. याशिवाय इमारतीच्या आतून व बाहेरून सिमेंटचा गिलावा व रंगकामही पूर्ण झाले आहे. तर अशाच प्रकारची अन्य कामेही चर्नी रोड स्थानकात झाली आहेत, परंतु प्रवासी सुविधाबाबतची कामे शिल्लक आहेत.

महालक्ष्मी आणि चर्नी रोड स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी प्रशस्त व मोकळी जागा उपलब्ध केली जात असून त्या कामाला सुरुवातही झाली आहे. प्रवेशद्वार आणखी मोठे करणे, इमारतीत प्रसाधनगृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, तिकीट खिडक्या, एटीव्हीएम आदी सुविधांचा त्यात समावेश आहे. वर्षभरात ही कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते, परंतु कोरोनामुळं ही कामे होऊ शकली नाहीत. आता पावसाळ्यातही अनेक कामे होऊ शकणार नाहीत. त्यानंतरच कामांना सुरुवात होऊ शकेल.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा