Advertisement

६ महिन्यांनंतर मोनो येणार ट्रॅकवर, दुसरा टप्पाही सुरू होणार

. मे अखेरीस ट्रकवर परतताना मोनोरेलचा वडाळा ते जेकब सर्कल असा दुसरा टप्पाही सुरू होत असल्याने प्रवाशांना चेंबूर ते जेकब सर्कल असा पूर्ण प्रवास करता येणार आहे.

६ महिन्यांनंतर मोनो येणार ट्रॅकवर, दुसरा टप्पाही सुरू होणार
SHARES

देशातील पहिल्या 'मोनोरेल'चा मान मिळवणारी मुंबई मोनोरेल (चेंबूर ते वडाळा) आगीची घटना घडल्यापासून तब्बल ५ महिन्यांपासून यार्डात आहे. पण लवकरच मोनोरेल पुन्हा ट्रॅकवर परतणार आहे. मे अखेरीस ट्रकवर परतताना मोनोरेलचा वडाळा ते जेकब सर्कल असा दुसरा टप्पाही सुरू होत असल्याने प्रवाशांना चेंबूर ते जेकब सर्कल असा पूर्ण प्रवास करता येणार आहे.


प्रक्रिया अंतिम टप्प्यात

२०११ पासून मोनोरेलचा वडाळा ते जेकब सर्कल टप्पा-२ रखडला आहे. या टप्प्याच्या आतापर्यंत अंदाजे ११ डेडलाईन चुकल्या आहेत. मात्र मुंबईकरांची दुसऱ्या टप्प्याची मोनोची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. प्रवाशांना चेंबूर ते वडाळाच नव्हे, तर चेंबूर ते जेकब सर्कल असा थेट प्रवास मोनोने करता येणार आहे. चेंबूर ते जेकब सर्कल मोनो मार्ग सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून मे अखेरीस हा मार्ग सुरू होईल, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)चे अतिरिक्त महानगर आयुक्त संजय खंदारे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.


आगीच्या भक्ष्यस्थानी

९ नोव्हेंबर २०१७ रोजी पहाटे सव्वा पाचच्या सुमारास चेंबूर मोनो स्थानकातून वडाळा मोनो स्थानकाकडे निघालेल्या मोनोगाडीला अचानक आग लागली. यात मोनोचे दोन डबे जळून खाक झाले. त्या दिवसापासून चेंबूर-वडाळा मोनो मार्ग बंद आहे. त्याचवेळी २०११ मध्ये जो वडाळा ते चेंबूर मार्ग सुरू होणं अपेक्षित होतं तो मार्ग एप्रिल २०१८ उजाडलं तरी सेवेत दाखल झालेला नाही. एमएमआरडीएच्या नियोजनशून्य आणि संथ कारभारामुळे मोनो प्रकल्प रखडल्याचं म्हटलं जात आहे.


सरकारकडून दबाव

मोनोच्या देखभाल-व्यवस्थापनासाठी एकीकडे कंत्राटदार मिळत नसताना दुसरीकडे दुसरा टप्पा कार्यान्वित करण्यासाठी कमिशन आॅफ रेल्वे सेफ्टीकडून सुरक्षा प्रमाणपत्र मिळत नसल्यानं मोनो यार्डातच आहे. आता मात्र एमएमआरडीएनं शक्य तितक्या लवकर मोनो ट्रॅकवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. मुळात २०१९ च्या निवडणुकांच्या धर्तीवर राज्य सरकारकडून दबाव येत असल्यानं एमएमआरडीए जोरात कामाला लागलं असून आता मे मध्ये मोनोचा संपूर्ण मार्ग सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.


निविदेला प्रतिसाद

देखभाल-व्यवस्थापनाच्या निविदेला अखेर प्रतिसाद मिळाला असून २ आठवड्यात निविदा अंतिम करत कंत्राट देण्यात येणार असल्याचं खंदारे यांनी स्पष्ट केलं आहे. तर सुरक्षा प्रमाणपत्राची प्रतिक्षाही लवकरच संपणार असल्यानं मे अखेरपर्यंत मोनो सेवेत दाखल होईल, असं खंदारे यांनी सांगितलं.हेही वाचा-

अरे व्वा! अवघ्या महिन्याभरात १ कोटी मुंबईकरांची 'मेट्रो सफर'

मार्चपासून 'सिंगल तिकीट' प्रणालीवर काम सुरूRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा