Advertisement

अरे व्वा! अवघ्या महिन्याभरात १ कोटी मुंबईकरांची 'मेट्रो सफर'

नोव्हेंबरमध्ये मेट्रो-१ ने एक अनोखा विक्रम साधला आहे. हा विक्रम आहे केवळ ३० दिवसांत १ कोटींच्यावर प्रवासी वाहून नेण्याचा. होय हे खरं आहे. नोव्हेंबर महिन्यात मेट्रोमधून तब्बल १ कोटी २ लाख ५७ हजार ५७ प्रवाशांनी प्रवास केला आहे.

अरे व्वा! अवघ्या महिन्याभरात १ कोटी मुंबईकरांची 'मेट्रो सफर'
SHARES

प्रवासीच मिळत नसल्याने चेंबूर ते वडाळा दरम्यान धावणाऱ्या मोनोरेलला दर दिवशी लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यातच मोनोरेलची सेवा ९ नोव्हेंबरला आग लागल्यापासून तब्बल २२ दिवसांपासून ठप्प असल्याने मोनोचा तोटा वाढत आहे. तर, दुसरीकडे मेट्रो मात्र प्रवाशांनी भरून वाहत आहे. हे सांगण्यामागचं कारण म्हणजे नोव्हेंबरमध्ये मेट्रो-१ ने एक अनोखा विक्रम साधला आहे. हा विक्रम आहे केवळ ३० दिवसांत १ कोटींच्यावर प्रवासी वाहून नेण्याचा. होय हे खरं आहे. नोव्हेंबर महिन्यात मेट्रोमधून तब्बल १ कोटी २ लाख ५७ हजार ५७ प्रवाशांनी प्रवास केला आहे.


गारेगार प्रवासाला प्राधान्य

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो-१ जून २०१४ मध्ये सेवेत दाखल झाली. लोकलच्या धक्काबुक्कीला, गर्दीला कंटाळलेल्या मुंबईकरांना मेट्रो-१ मुळे गारेगार आणि सुपरफास्ट प्रवास करता येऊ लागला. त्यामुळे वर्सोवा ते घाटकोपर मार्गावरून प्रवास करणाऱ्यांनी रेल्वे, बस, रिक्षा, टॅक्सीला बगल देत मेट्रोचा पर्याय स्वीकारण्यास सुरूवात केली. म्हणूनच सुरूवातीपासूनच मेट्रो-१ ला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला.



सव्वातीन वर्षांतील विक्रम

हा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत चालल्याचेच नोव्हेंबर २०१७ च्या आकडेवारीवरून समोर येत आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये मेट्रोच्या १० हजार ६०६ फेऱ्या झाल्या असून या फेऱ्यांद्वारे १ कोटी २ लाख ५७ हजार ५७ प्रवाशांनी प्रवास केला आहे. गेल्या सव्वा तीन वर्षांतील प्रवाशांचा हा विक्रमी आकडा असल्याचं मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल)कडून जाहीर करण्यात आलं. मेट्रोतून दररोज सरासरी ३ लाख प्रवासी प्रवास करतात.


याआधीची आकडेवारी

याआधी नोव्हेंबर २०१५ मध्ये ७० लाख ६७ हजार ७७५ प्रवाशांनी मेट्रो प्रवास केला होता. तर, नोव्हेंबर २०१६ मध्ये ८४ लाख ९२ हजार ६५० प्रवाशांनी मेट्रो प्रवास केला होता.


सुपरफास्ट प्रवास

वेळापत्रकात गडबड नाही, मेट्रो वेळेवर धावतात, मेट्रोमध्ये प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरवल्या जातात आणि मेट्रो प्रवाशांची योग्य ती काळजी घेते. यामुळेच मुंबईकर मेट्रोला पसंती देत असल्याची प्रतिक्रिया 'एमएमओपीएल'ने दिली.



हेही वाचा-

मेट्रो प्रवाशांनो रांग विसरा, 'असं' मिळवा मोबाईलवर तिकीट!

नाहीतर मेट्रो ३ ला ब्रेक लावू, उच्च न्यायालयाने 'एमएमआरसी'ला ठणकावलं


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा