Advertisement

स्कोमीच्या हलगर्जीपणामुळे मोनोला आग! एमएमआरडीए करणार कारवाई

ज्या आगीमुळे मोनोरेल ठप्प झाली, ती आग मोनोरेलला सर्वस्वी जबाबदारी असलेल्या कंत्राटदार कंपनी स्कोमीच्या हलगर्जीपणामुळे लागल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)तील सूत्रांनी दिली आहे.

स्कोमीच्या हलगर्जीपणामुळे मोनोला आग! एमएमआरडीए करणार कारवाई
SHARES

आग लागल्याच्या घटनेमुळे देशातला पहिला मोनोरेल मार्ग गेल्या २८ दिवसांपासून बंद आहे. आता ही सेवा कधी पूर्ववत होणार? हाच प्रश्न आहे. असे असताना ज्या आगीमुळे मोनोरेल ठप्प झाली, ती आग मोनोरेलला सर्वस्वी जबाबदारी असलेल्या कंत्राटदार कंपनी स्कोमीच्या हलगर्जीपणामुळे लागल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)तील सूत्रांनी दिली आहे. तर एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त संजय खंदारे यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला असून याप्रकरणी दोषी स्कोमीला दंड आकारण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


कशी लागली आग?

९ नोव्हेंबरला पहाटे सव्वा पाचच्या सुमारास चेंबुरवरून वडाळ्याच्या दिशेने निघालेल्या मोनो गाडीला म्हैसुर कॉलनी मोनो स्थानकादरम्यान आग लागली होती. या आगीत मोनो गाडीचे दोन डबे जळून खाक झाले होते. मात्र पहाटेची वेळ असल्याने मोनोमध्ये कुणीही प्रवासी नव्हते. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पण या आगीमुळे मोनो ही 'आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक सेवा' असल्याचा राज्य सरकार आणि एमएमआरडीएचा दावा किती फोल आहे, हेही समोर आले. कारण ही आग लागल्याबरोबर ठप्पा झालेली मोनो अजूनही ठप्प आहे. आतापर्यंत कोणतीही वाहतूक व्यवस्था कोणत्याही दुर्घटनेमुळे महिनाभर बंद ठेवावी लागल्याचे मुंबईकरांच्या पाहण्यात नाही.



ट्रायलसाठी रात्रभर फेऱ्या

दरम्यान, या आगीनंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाचे निवृत्त आयुक्त पी. एस. वाघेला यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने नुकताच यासंबंधीचा अंतिम अहवाल एमएमआरडीएकडे सादर केला आहे. या अहवालानुसार दुर्घटनेच्या आधी मोनो रात्रभर ट्रायल रनसाठी फेऱ्या मारत होती. त्यामुळे मोनोचा टायर गरम झाला आणि त्यातून धूर येऊ लागला. हा प्रकार लक्षात आल्याबरोबर कर्मचाऱ्यांनी धुरावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले, पण त्यात त्यांना यश आले नाही आणि आग भडकली. तर त्याचवेळी आगीसारख्या दुर्घटनेशी सामना करण्यासाठीची मोनो प्रकल्पातील आपत्कालीन यंत्रणाही फेल ठरल्याचे या अहवालातून उघड झाले आहे.


स्कोमी दोषी, पण कारवाई काय?

चौकशी समितीच्या अहवालानुसार स्कोमी याप्रकरणी दोषी आढळली असून आता स्कोमीविरोधात काय कारवाई होणार? हे पाहणेही महत्त्वाचे आहे. स्कोमीविरोधात कडक कायदेशीर कारवाईची मागणी होत असताना एमएमआरडीएकडून केवळ दंडात्मक कारवाईच होण्याची शक्यता आहे. कारण खंदारे यांनी सध्या तरी केवळ दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले आहे.


अजून काही दिवस मोनो बंदच

मोनोरेल सेवेत असतानाही प्रवासी संख्येअभावी दिवसाला आठ ते दहा लाखांचा तोटा या प्रकल्पात होत होता. आता ही सेेवा २८ दिवसांपासून बंद असून पुढे आणखी काही दिवस सेवा बंद राहणार असल्याने हा तोटा वाढतच जाणार आहे. त्यामुळे कोट्यवधींचा महसूल बुडत असल्याची कबुलीही खंदारे यांनी दिली आहे.



हेही वाचा

मोनोराणी पुन्हा ट्रॅकवर कधी? कुणालाच माहिती नाही


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा