Advertisement

मोनोराणी पुन्हा ट्रॅकवर कधी? कुणालाच माहिती नाही

आगीमुळे मोनो सेवेलाच ब्रेक लागला असून आता मोनो पुन्हा ट्रॅकवर कधी येणार अर्थात मोनोची वाहतूक कधी सुरू होणार? हाच प्रश्न आहे. कारण मोनो गाड्यांची चाचणी पूर्ण झाल्याशिवाय मोनोची वाहतुक सुरू न करण्याचे आदेश मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या महानगर आयुक्तांकडून देण्यात आले आहेत.

मोनोराणी पुन्हा ट्रॅकवर कधी? कुणालाच माहिती नाही
SHARES

नागमोडी वळण घेत हवेतून गारेगार प्रवास करण्याचा सुखद आनंद देणाऱ्या मोनोरेलला गुरूवारी पहाटे ५.१५ च्या सुमारास ब्रेक लागला, तो अचानक लागलेल्या आगीमुळे. 'इलेक्ट्रीक ब्रेक फेल' झाल्याने लागलेल्या आगीत मोनोचे २ डबे जळून खाक झाले. या आगीमुळे मोनो सेवेलाच ब्रेक लागला असून आता मोनो पुन्हा ट्रॅकवर कधी येणार अर्थात मोनोची वाहतूक कधी सुरू होणार? हाच प्रश्न आहे. कारण मोनो गाड्यांची चाचणी पूर्ण झाल्याशिवाय मोनोची वाहतुक सुरू न करण्याचे आदेश मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या महानगर आयुक्तांकडून देण्यात आले आहेत.

त्यामुळे ही चाचणी पूर्ण करण्यास नेमके किती दिवस लागतील याचं ठोस उत्तर 'एमएमआरडीए'कडेही नसल्याने मोनो ट्रॅकवर येण्यासाठी प्रवाशांना प्रतिक्षा करावी लागणार आहे.


रोज ६-७ लाखांचा तोटा

चेंबूर ते जेकब सर्कल मोनो मार्गातील चेंबूर ते वडाळा या पहिला टप्पा ३ वर्षांपूर्वी सेवेत दाखल झाला आहे. त्यानुसार या मार्गावरून पहाटे ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत मोनो धावते. पण या मार्गाला गेल्या ३ वर्षांत म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. मोनोला प्रवाशीच मिळत नसल्याने दिवसांतून कित्येक फेऱ्या प्रवाशाविनाच मोनोला कराव्या लागतात. त्यामुळेच दिवसाला ६ ते ७ लाखांचा तोटा 'एमएमआरडीए'ला सहन करावा लागत आहे.


तोट्यात भर

असं असताना आता आगीमुळे मोनो गुरूवारी पूर्ण दिवस बंद असून आता पुढचे किती दिवस बंद राहणार आहे हा प्रश्नच आहे. त्यामुळे मोनोच्या तोट्यात आणखी भर पडणार आहे. त्याचवेळी जे काही थोडे थोडके मोनोचे दैनंदिन प्रवासी आहेत, त्यांना मोनो ठप्प राहिल्याने चांगलाच फटका बसणार आहे.


मोनोची आग सकाळी सहा वाजता विझवण्यात आली असली तरी ट्रॅक रिकामा करत इतर कामे करण्यासाठी बराच वेळ लागणार आहे. त्याचवेळी गाड्यांची पूर्णपणे तपासणी झाल्याशिवाय गाड्या ट्रॅकवर आणण्यात येणार नाही. त्यामुळे गुरूवारी पूर्ण दिवस मोनोची सेवा बंद असून चाचण्यांचं काम पूर्ण झाल्याशिवाय मोनो सेवा सुरू होणार नाही. यासाठी किती काळ लागेल हे आताच सांगता येणार नाही.

- दिलीप कवठकर, सहप्रकल्प संचालक (जनसंपर्क)


यापूर्वीही अनेकदा मोनोविघ्न

  • २०१५ मध्ये वीज पुरवठा खंडीत झाल्याने भक्तीपार्क स्टेशनजवळ मोनो बंद
  • २०१६ मध्ये आॅगस्ट महिन्यात चेंबूर ते वडाळादरम्यान अचानाक मोनो गाडी बंद.
  • तब्बल ४ तास मोनो गाडी अडकून.
  • मोनोला ओढून नेण्यासाठी बोलवावी लागली दुसरी मोनो.
  • २०१६ मध्ये आॅक्टोबरमध्ये मोनोरेलच्या वडाळा ते जेकब सर्कल या दुसऱ्या टप्प्याचं काम सुरू असताना मोनोच्या ट्रॅकचा काही भाग निखळून रस्त्यावर पडला. पण स्थानिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला.
  • २०१७ जुलैमध्ये दोन मोनो गाड्या एकमेकांवर धडकल्या. यावेळीही मोठा अपघात टळला.
  • या सर्व घटना लक्षात घेता अत्याधुनिक, आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा प्रकल्प खरंच सुरक्षित आहे का? हाच प्रश्न निर्माण झाला आहे.
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा