Advertisement

वेतन अहवालाची होळी? एसटीने मारली मोफत प्रवास सवलतीला गोळी

होळी आंदोलनात सहभागी होणं निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना चांगलंच महागात पडलं आहे. कारण महामंडळाने या निवृत्त कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली मोफत एसटी प्रवास सवलत तातडीनं बंद केली आहे.

वेतन अहवालाची होळी? एसटीने मारली मोफत प्रवास सवलतीला गोळी
SHARES

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा (एसटी) च्या कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसाठी एेन दिवाळीत ४ दिवस कामबंद आंदोलन केल्यानंतर २५ जानेवारीला उच्च न्यायालयाच्या उच्चस्तरीय समितीच्या वेतनविषयक अहवालाची होळी केली होती. एसटी महामंडळाच्या प्रत्येक विभागीय कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या 'होळी आंदोलनात' एसटी कर्मचाऱ्यांसह निवृत्त एसटी कर्मचारी देखील सहभागी झाले होते. पण या आंदोलनात सहभागी होणं निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना चांगलंच महागात पडलं आहे. कारण महामंडळाने या निवृत्त कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली मोफत एसटी प्रवास सवलत तातडीनं बंद केली आहे. त्यासंबंधीची अधिकृत माहिती एसटी महामंडळाकडून सोमवारी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली.


काय आहे प्रकरण?

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा मुद्दा उच्च न्यायालयात गेला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वेतनवाढीचा मुद्दा निकाली काढण्यासाठी उच्च स्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने काही दिवसांपूर्वीच आपला अहवाल सादर केला असून या अहवालात समितीने तुटपुंजी वेतनवाढ कर्मचाऱ्यांसाठी सूचवली आहे. ही वेतनवाढ एसटी कर्मचाऱ्यांना मान्य नसून हा प्रकार म्हणजे कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्यासारखा असल्याचं म्हणत या अहवालाला त्यांनी विरोध केला आहे.


म्हणून पेटवली होळी

हा विरोध व्यक्त करण्यासाठी मुंबईसह राज्यभर २५ जानेवारीला एसटी महामंडळाच्या विभागीय आणि आगार कार्यालयाच्या समोर अहवालाच्या प्रतींची होळी करण्यात आली. या आंदोलनात निवृत्त कर्मचारीही सहभागी झाले होते. निवृत्त कर्मचाऱ्यांचा या आंदोलनाशी, वेतनवाढीचा काय संबंध? असा सवाल एसटी महामंडळानं उपस्थित केला आहे.


'असा' दिला दणका

निवृत्त कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभागी होत एसटी महामंडळाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत महामंडळाने आंदोलनात सहभागी झालेल्या निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांची मोफत एसटी प्रवासाची सवलत कायमची बंद केली आहे. केवळ निवृत्त कर्मचारीच नव्हे, तर एसटी कर्मचारी आणि एसटी संघटनांसाठीही हा दणका असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.


वाद चिघळणार?

वेतनवाढीवरून आधीच वाद सुरू असताना आता निवृत्त कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाने दणका दिल्यानं हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कारण महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने एसटी महामंडळाच्या या निर्णयाला जोरदार विरोध केला आहे. हा निर्णय अन्यायकारक असल्याचं म्हणत संघटनेचे अध्यक्ष संदिप शिंदे यांनी या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी एसटी महामंडळाकडे करण्यात येणार असल्याचं 'मुंबई लाइव्ह'ला सांगितलं.


हेही वाचा-


एसटी कर्मचाऱ्यांचा वेतनवाढीसाठी आक्रोश, मुंबईत कुटुंबीयांसह काढणार मोर्चा


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा