Advertisement

एसटीची मालवाहतूकीतून ५६ कोटींची कमाई

मालवाहतूक सेवाही एसटी महामंडळानं सुरू केली. त्यानुसार, एसटी महामंडळानं मालवाहतूकीतून ५६ कोटींचा महसूल जमा केला आहे.

एसटीची मालवाहतूकीतून ५६ कोटींची कमाई
SHARES

एसटी महामंडळानं आपल्या प्रवाशांसाठी नेहमीच नवनवीन उपक्रम राबवले आहेत. विशेष सुविधा व सवलतीही दिल्या आहेत. अशातच मालवाहतूक सेवाही एसटी महामंडळानं सुरू केली. त्यानुसार, एसटी महामंडळानं मालवाहतूकीतून ५६ कोटींचा महसूल जमा केला आहे. कोरोनाच्या काळात मालवाहतूक क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या एसटी महामंडळाच्या 'महाकार्गो'नं अवघ्या वर्षभरात महाभरारी घेतली आहे. 

खासगी वाहतूक कंपन्यांच्या तुलनेत किफायतीशीर दर आणि सुरक्षित सेवा देणाऱ्या 'महाकार्गो'नं गेल्या वर्षभरात मालवाहतूकीसाठी १ कोटी ४० लाख किलोमीटरचा टप्पा पार करत महामंडळाच्या तिजोरीत ५६ कोटींचा महसूल जमा केला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं गेल्यावर्षी लॉकडाऊन घोषित केला होता. शासनाच्या कडक निर्बंधांमुळं जीवनावश्यक वस्तूंचा तसंच इतर मालांच्या वाहतूकीवर विपरित परिणाम झाला होता.

या परिस्थितीवर मात करण्यासाठी एसटी महामंडळानं मालवाहतूक क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २१ मे २०२० पासून  राज्यभरात अतिशय माफक दरात मालवाहतूक सेवा सुरु करण्यात आली. खासगी वाहतूकीच्या तुलनेत किफायतशीर दर असल्यानं एसटीची ही मालवाहतूक सेवा उपयुक्त ठरू लागली.

जलद, खात्रीशीर आणि  सुरक्षीत सेवा देणाऱ्या मालवाहतूकीला अल्पावधीतच उत्स्फुर्त  प्रतिसाद मिळाला. मालवाहतूकीला मिळालेला प्रतिसाद  पाहून महामंडळानं 'महाकार्गो' या नावानं हा ब्रँड विकसित केला आहे. त्यामुळं मालवाहतूकीचे ट्रक आता आकर्षक आणि नव्या रूपात  'महाकार्गो' या नावानं रस्त्यावर धावत आहेत.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांत विभाग नियंत्रकांमार्फत मालवाहतूकीचे नियोजन केलं जाते. या मालवाहतूकीवर महामंडळाच्या मध्यवर्ती  कार्यालयातून नियंत्रण ठेवलं जात असूनं मालवाहतूकीसाठी स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात आला आहे. मालवाहतूकीसाठी एसटीच्या ताफ्यात 'महाकार्गो'चे ११५० ट्रक आहेत. 'महाकार्गो'नं आतापर्यंत ९५ हजार फेऱ्यांच्या माध्यमातून ७ लाख मेट्रीक टन मालाची वाहतूक केली असून तब्बल १ कोटी ४० लाख किलोमीटरचा टप्पा पार केला आहे.

मालवाहतूकीच्या माध्यमातून महामंडळाला वर्षभरात  ५६ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळालं आहे. शासनाच्यावतीनं रेशनिंगवर पोहोचविला जाणारा अन्न-धान्यांचा पुरवठा, बी-बीयाणे, शालेय पुस्तके, निवडणूक आयोगाची मतदान यंत्रे, खासगी कंपन्या याचबरोबर कोकणातील आंबा बागायतदार तसेच सिमेंट कंपन्यांही मालाच्या वाहतुकीसाठी 'महाकार्गो' ट्रकचा उपयोग करीत आहेत.

एसटी महामंडळानं पुढील वर्षभरात मालवाहतूकीतून १०० कोटी  रूपयांपर्यंत महसूलाचे उद्दीष्ट  गाठण्याचा निर्धार केला आहे. दरम्यान, विविध शासकीय विभागामार्फत खासगी मालवाहतूकदारांकडून जी मालवाहतूक करण्यात येते त्यातील २५ टक्के माल वाहतुकीचे काम राज्य परिवहन महामंडळास देण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे.

मालवाहतूकी संदर्भात अधिक माहितीसाठी ०२२-२३०२४०६८ या  क्रमांकावर  संपर्क  साधावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केलं आहे.



हेही वाचा -

आता घरीच करा कोरोना चाचणी; वाचा कशी करायची?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षा चालकांना आर्थिक मदत


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा