Advertisement

‘एसटी’ करणार मालवाहतूक, चालवणार गोदाम..!

राज्यात विविध ठिकाणी पडून असलेल्या जागांवर ३०१ गोदामांची निर्मिती करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा माल शहरी बाजारपेठेपर्यंत पोहोचवणं एसटीच्या सेवेमुळे आणखी सोपं होणार आहे.

‘एसटी’ करणार मालवाहतूक, चालवणार गोदाम..!
SHARES

उत्पन्न वाढवण्यासाठी आणि लोकांना विविध सुविधा किफायतशीर दरात उपलब्ध करुन देण्यासाठी एसटी महामंडळ लवकरच मालवाहतूक आणि गोदाम सेवा सुरु करत आहे. त्यासाठी राज्यात विविध ठिकाणी पडून असलेल्या जागांवर ३०१ गोदामांची निर्मिती करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा माल शहरी बाजारपेठेपर्यंत पोहोचवणं एसटीच्या सेवेमुळे आणखी सोपं होणार आहे.

सह्याद्री अतिथीगृहावर गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एसटीच्या मालवाहतूक आणि गोदामांच्या सेवेसंदर्भात निर्णय घेण्यात आला. ही सेवा लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी यावेळी दिली.


जुन्या बसचा वापर

मालवाहतूक सेवेसाठी स्वतंत्र बस वापरण्यात येणार आहेत. एसटीच्या ताफ्यातील जुन्या बसच्या तांत्रिक बाबी तपासून त्यांचं मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये रुपांतरण करण्यात येणार आहे. यानुसार साधारण ३ हजार जुन्या प्रवासी बसचं मालवाहतूक वाहनांमध्ये रुपांतरण करण्यात येणार आहे. तसंच, काही नवीन मालवाहतूक वाहने खरेदी करण्याचाही प्रस्ताव आहे. त्यासाठी परिवहन विभागाची रीतसर परवानगी देखील घेण्यात येणार आहे.


शेतकऱ्यांची लूट थांबणार

या सेवेमुळे ग्रामीण भागातील रहिवासी, शेतकरी यांची व्यापारी लूट थांबून किफायतशीर दरात हक्काचं मालवाहतूक साधन मिळण्यास मदत होणार आहे. कृषी माल, अन्नधान्य, भाजीपाला, फळे, व्यापारी माल, स्टेशनरी आदी सर्व प्रकारच्या मान्यताप्राप्त मालाची वाहतूक या वाहनांतून करण्यात येणार आहे.


स्वतंत्र विभाग

तर ३ टप्प्यांमध्ये या गोदामांची बांधणी करण्यात येणार आहे. मालवाहतूक आणि गोदामे यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महामंडळात सहव्यवस्थापकीय संचालक हे नवीन पद निर्माण करण्यात येणार आहे. या विभागासाठी स्वतंत्र विभाग आणि स्वतंत्र कर्मचारी वर्गही नियुक्त करण्याचं प्रस्तावित आहे.



हेही वाचा-

एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेतनवाढीतील फरक एकरकमी मिळणार

Good News: एसटी कर्मचाऱ्यांना बालसंगोपनासाठी ६ महिन्यांची रजा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा