Advertisement

यंदाच्या दिवाळीत एसटीतून करता येणार 'कॅशलेस' प्रवास

दिवाळीनिमित्त सुट्ट्या आणि हिवाळ्यात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवासी बाहेर पडतात.

यंदाच्या दिवाळीत एसटीतून करता येणार 'कॅशलेस' प्रवास
SHARES

एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदाच्या दिवाळीत प्रवाशांना एसटीमधून कॅशलेस प्रवास करता येणार आहे. एसटी महामंडळाचे प्रवासात सवलती देणारे स्मार्ट कार्ड दिवाळीच्या मुहुर्तावर सुरू करण्यात येणार आहे. तसंच, प्रवाशांसाठी ११ ते २२ नोव्हेंबर या काळात जादा गाड्या सुरू करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

एसटी महामंडळाचे स्मार्ट कार्ड बस स्थानकाऐवजी खासगी कंपनीतील एजंटकडे उपलब्ध होणार आहे. दिवाळीनिमित्त सुट्ट्या आणि हिवाळ्यात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रवासी बाहेर पडतात. तसंच, या काळात एसटी गाड्यांची मागणी वाढते. त्यामुळं या काळात नियमित गाड्यांच्या व्यतिरिक्त यंदा १००० जादा गाड्या चालवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दरवर्षी दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाकडून जादा गाड्या सोडण्यात येतात. परंतु, यंदा ही संख्या जाहीर केलेली नाही.

केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमानुसार एसटीत कॅशलेस प्रवास सुरू करण्यासाठी ओटीसी (ओव्हर द काऊंटर) स्मार्ट कार्ड दिवाळीच्या मुहुर्तावर सुरू करण्यात येणार आहे. या कार्डमध्ये ट्रॅव्हल वॉलेट आणि शॉपिंग वॉलेट यांचा समावेश असणार आहे. हे कार्ड घेण्यासाठी खासगी एजंटकडे नाव आणि मोबाइल क्रमांक नोंदवणे आवश्यक असणार आहे.

कार्ड रिचार्जसाठी या खासगी एजंटकडे संपर्क साधावा, असे महामंडळाने काढलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. ८ ते २२ नोव्हेंबरदरम्यान खूप सार्वजनिक सुट्ट्या आहेत. लॉकडाउनमुळे घरातच असलेला पर्यटक या निमित्ताने बाहेर पडण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात ११ ते १६ नोव्हेंबरदरम्यान अधिकाधिक प्रवासी एसटी प्रवासाला प्राधान्य देतील, अशी अटकळ आहे.

१७ ते २२ नोव्हेंबर दरम्यान या प्रवाशांचा तसेच पर्यटकांचा परतीचा प्रवास सुरू होईल. लक्ष्मी पूजन, पाडवा अशा मुहूर्तावर गावी पोहोचणाऱ्या गाड्या त्या ठिकाणी मुक्कामी राहतील व दुसऱ्या दिवशी प्रवाशांना प्रवासासाठी गाड्या मिळतील, अशी व्यवस्था करण्यात यावी, असे आदेश वाहतूक विभागाने दिले आहेत.

कोरोनामुळे थांबलेल्या तब्बल ७००० एसटी गाड्या राज्यात जोमाने प्रवासी वाहतूक करत आहेत. सध्या ८ लाख प्रवाशांचा या गाड्यांतून दररोजचा प्रवास सुरू आहे. मुंबईत प्रवासी वाहतुकीसाठीही एसटी धावून आली आहे. शहरातील बेस्टच्या विविध मार्गांवर १००० एसटी गाड्या सध्या चालवण्यात येत आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा