मुंबई-नागपूर सुपर एक्स्प्रेस वेच्या मोजणीला सुरुवात

 Pali Hill
मुंबई-नागपूर सुपर एक्स्प्रेस वेच्या मोजणीला सुरुवात

मुंबई - मुंबई ते नागपूर असा 825 किमीचा प्रवास केवळ आठ तासांत करण्याचं मुंबई आणि नागपुरकरांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. कारण मुंबई - नागपूर सुपर एक्स्प्रेस वेच्या संयुक्त जमीन मोजणीला सोमवारपासून सुरुवात करण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता दिलीप साळुंखे यांनी मुंबई लाईव्हशी बोलताना दिली. संयुक्त जमीन मोजणीअंर्तगत या प्रकल्पासाठी नेमकी किती आणि कुठली जागा लागेल, ती कशी मिळेल याचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. दरम्यान प्रकल्पाच्या तांत्रिक सर्व्हेक्षणाला याआधीच सुरुवात झाली. त्याअनुषंगाने फेब्रुवारी 2017 मध्ये प्रकल्पाच्या बांधकामासाठी निविदा काढत मे मध्ये बांधकामाचं कंत्राट दिली जाण्याची शक्यता आहे.

असा असेल मुंबई - नागपूर सुपर एक्स्प्रेस वे

-825 किमी अंतराचा आणि आठ मार्गिकेचा एक्स्प्रेस वे

-10 जिल्हे, 22 तालुके आणि 345 गावांमधून जाणारा एक्स्प्रेस वे

-सुमारे 8 हजार 520 हेक्टर जमीन संपादनाची गरज

-खर्च अंदाजे रु. 46 हजार कोटी

-2017 मध्ये कामाला सुरुवात करत 2019 मध्ये काम पूर्ण करण्याचा मानस

-सुपर एक्स्प्रेस वे मुळे मुंबई ते नागपूर 16 तासांचे अंतर 8 तासांवर येणार

Loading Comments