Advertisement

मध्य रेल्वेवर २७ तासांचा ब्लॉक, शनिवार-रविवारी धावणार बेस्टची विशेष बस सेवा

ब्लॉक दरम्यान १२ जादा बस चालिवण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली. जाणून घ्या कुठल्या मार्गावरून बस धावणार आहेत.

मध्य रेल्वेवर २७ तासांचा ब्लॉक, शनिवार-रविवारी धावणार बेस्टची विशेष बस सेवा
SHARES

मध्य रेल्वे मार्गावर कर्नाक बंदर पुल तोडण्यासाठी येत्या शनिवारी रात्रीपासून रविवार रात्रीपर्यत २७ तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉक दरम्यान बेस्ट उपक्रमाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी शनिवारी रात्री १०.३० वाजल्यापासून रविवारी सकाळी साडे सहा वाजेपर्यत १२ जादा बस चालिवण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली.


सीएसएमटी ते मस्जिद बंदर दरम्यानचा ब्रिटिशकालीन कर्नाक पूल शनिवार १९ नोव्हेंबरच्या रात्रीपासून तोडण्याचे काम सुरू केले जाणार आहे. त्यामुळे या कालावधीत शनिवारी रात्रीपासून रविवारी, २० नोव्हेंबरपर्यत २७ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान लोकल आणि मेल-एक्सप्रेसच्या वाहतुकीत मोठे बदल केले आहेत.

या ब्लॉक कालावधीत लोकल फक्त मध्य रेल्वेवर भायखळा आणि हार्बर मार्गावर वडाळ्यापर्यत धावणार आहेत. सीएसएमटी ते भायखळा आणि वडाळा रोड दरम्यानची लोकल वाहतुक पूर्ण बंद राहणार असल्याने या मार्गावर एकही लोकल धावणार नाही. तसेच लांब पल्याच्या गाड्यांवरही परिणाम होणार असल्याने रेल्वेने ३६ मेल-एक्स्प्रेस रद्द केल्या आहेत.

काही गाड्या दादर, पनवेल पर्यतच चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने बेस्ट प्रशासनाला जादा बस चालविण्यास सांगितले आहे. त्यानुसार बेस्ट उपक्रमाने शनिवारी रात्री १०.३० ते रविवारी सकाळी ६.३० वाजेपर्यत १२ जादा बस चालविणार आहे. तसेच आणखी सात प्रमुख मार्गांवर रविवारी आणखी ३५ बस सोडण्यात येणार आहेत.

शनिवारी रात्री १०.३० ते रविवारी सकाळी साडे सहा वाजेपर्यंत, सीएसएमटी - वडाळा, सीएसएमटी - दादर आणि भायखळा (प) - कुलाबा (प्रत्येक मार्गावर चार अतिरिक्त बस) यासह तीन मार्गांवर १२ जादा बसेस बेस्टकडून चालवल्या जातील.

तसेच रविवारी सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यत इलेक्ट्रिक हाऊस- वडाळा (प), सीएसएमटी- धारावी डेपो, मुखर्जी चौक- प्रतीक्षा नगर, मंत्रालय- माहुल, इलेक्ट्रिक हाउस- के सर्कल आणि अँटॉप हिल- कोतवाल उद्यान या मार्गावर ३५ जादा बस सोडण्यात येणार असल्याचे बेस्टकडून सांगण्यात आले.



हेही वाचा

19 आणि 20 नोव्हेंबरला मध्य रेल्वेकडून ब्लॉक, रद्द झालेल्या 36 एक्स्प्रेसची यादी एका क्लिकवर

मध्य रेल्वेचा २७ तासांचा जम्बो ब्लॉक, 'या' स्थानकांदरम्यान लोकल सेवा बंद

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा