Advertisement

‘दहिसर – मिरारोड मेट्रो ९ मार्गिकेच्या कारशेडसाठीचा मार्ग मोकळा

मेट्रोच्या विस्तारामुळे मुंबईकरांना भविष्यात पॅगोडा आणि एस्सेल वर्ल्डला जाणे सोपे होणार आहे.

‘दहिसर – मिरारोड मेट्रो ९ मार्गिकेच्या कारशेडसाठीचा मार्ग मोकळा
SHARES

राज्य सरकारने ‘दहिसर – मिरारोड मेट्रो ९’ मार्गिकेच्या कारशेडसाठी उत्तन येथील डोंगरी गावातील ६९ एकर जागा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) देण्यास हिरवा कंदिल दाखवला आहे.

येत्या आठ ते दहा दिवसात ही जागा एमएमआरडीएच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे. परिमाणी ‘मेट्रो ९’ची कारशेड उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

दहिसर – मीरा रोडदरम्यानचा प्रवास जलदगतीने व्हावा या उद्देशाने एमएमआरडीए १०.५ किमी लांबीच्या ‘मेट्रो ९’ मार्गिकेची उभारणी करीत आहे.

‘मेट्रो ९’चे काम वेगात सुरू असताना या मार्गिकेच्या कारशेडचा प्रश्न गंभीर बनला होता. मुळ आराखड्यानुसार या मार्गिकेसाठी राई, मुर्धा, मोर्वा या गावात कारशेड उभारण्यात येणार होती. मात्र येथे कारशेड उभारण्यास स्थानिक रहिवाशांनी कडाडून विरोध केला होता.

अखेर रहिवाशांच्या आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने राई, मुर्धा, मोर्वा येथील कारशेड रद्द केली. स्थानिक रहिवाशांनीच कारशेडसाठी पर्यायी जागा सुचविली होती. त्यानुसार राज्य सरकारने उत्तन येथील डोंगरी गावातील जागेचा पर्याय निवडला आहे.

आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून येत्या आठ ते दहा दिवसांत ही जागा एमएमआरडीएच्या ताब्यात येण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. जागा ताब्यात आल्यानंतर कारशेडची उभारणी करण्याच्यादृष्टीने एमएमआरडीए पुढील कार्यवाही करणार आहे.

दरम्यान, कारशेड राई, मुर्धा,मोर्वा येथून डोंगरीला हलविण्यात आल्याने ‘मेट्रो ९’ मार्गिकेचा अंदाजे ५.५ किमीने विस्तार एमएमआरडीएला करावा लागणार आहे. या विस्तारीत मार्गिकेचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.

हा विस्तार झाल्यास दहिसरवरून थेट उत्तन काही मिनिटात गाठता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या मार्गिकेचे शेवटचे स्थानक पॅगोडा आणि एस्सेल वर्ल्ड या दोन पर्यटनस्थळांच्या नजिक असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना भविष्यात पॅगोडा आणि एस्सेल वर्ल्डला जाणे सोपे होणार आहे.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा