Advertisement

लोकलची रखडंपट्टी, रोड ओव्हर ब्रिजसाठी पालिका निरुत्साही


लोकलची रखडंपट्टी, रोड ओव्हर ब्रिजसाठी पालिका निरुत्साही
SHARES

ट्रेन फास्ट असो की स्लो, ती पूर्ण प्रवासात दोन ते तीन वेळा रखडल्याशिवाय पोहोचतच नाही. बहुधा प्रत्येक मुंबईकराचं हेच म्हणणं असावं. आणि या प्रत्येक रखडंपट्टीसाठी अडकलेल्या लोकलमधल्या प्रवाशांकडून लाखोली वाहिली जाते. कधी रेल्वे प्रशासनाला, कधी मोटरमनला तर कधी सिग्नल यंत्रणेला. पण याचं खरं कारण आहे आरओबी, म्हणजेच रोड ओव्हर ब्रिज.


कुठे अडतं लोकलचं घोडं?

कोणत्याही रेल्वे क्रॉसिंगवर प्रवाशांना लाईन क्रॉस करण्यासाठी एक तर रेल्वे फाटक उघडावे लागते, किंवा रोड ओव्हर ब्रीजची आवश्यकता पडते. मध्य रेल्वेच्या बहुतांश क्रॉसिंगवर फाटक उघडल्यामुळेच लोकलची रखडंपट्टी होते. अशा ठिकाणी रोड ओव्हर ब्रिजचं काम सुरु करण्यात आलं आहे. मात्र ते अद्याप पूर्ण झालेलं नाही.

अनेक ठिकाणी रेल्वेने त्यांच्या हिश्श्याचं काम पूर्णही केलं आहे. मात्र दोन्ही बाजूंना ब्रिजला उतार देण्यासाठी पालिकेकडून जमीनच उपलब्ध होत नाही. किंवा काही ठिकाणी अशा जमिनींवर अतिक्रमणं झालेलं असतात. त्याशिवाय काही ठिकाणी पालिका आणि राज्य शासनाच्या मंजुरीसाठी ब्रिजचे प्रस्ताव रखडतात. त्यामुळेच ब्रिजची कामं रखडल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे


आरओबीमुळे कसा होईल फायदा?

आरओबी अर्थात रोड ओव्हर ब्रिज झाल्यास प्रवाशांना रेल्वे लाईन क्रॉस करण्यासाठी फाटक उघडावे लागणार नाही. त्यामुळे अशा क्रॉसिंगवर होणारा लोकलचा १० ते १५ मिनिटांचा खोळंबा टाळता येईल. त्यामुळे आरओबीचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

हार्बर मार्गावर चुनाभट्टी येथे फाटक सुरू आहे. हे फाटक वाहनांसाठी जास्त काळ खुले राहिल्यास त्याचा परिणाम लोकल सेवांवर होतो. आता चुनाभट्टी स्थानकातील फाटक बंद करण्यासाठी संबंधित यंत्रणा काम करत आहे.

दिवा स्थानकात दिवसातून ३० ते ४० वेळा फाटक उघडण्यात येते आणि बंद होते. तर ठाकुर्ली, टिटवाळा, शहाड, खारीगाव (कळवा) येथे प्रत्येकी १० ते १५ वेळा फाटक उघडले जाते. यामुळे दिवसभरातील सुमारे १०० फेऱ्यांना लेटमार्क लागत असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

रेल्वेच्या अखत्यारीत असलेल्या आरओबीचे काम पूर्ण झाले आहे. संबंधित महापालिकांकडून कामास विलंब होत आहे. स्पीड, स्किल आणि स्केल अंतर्गत एका वर्षाच्या आत रेल्वे फाटक बंद करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार उपनगरीय मार्गावरील फाटक देखील बंद करण्यात येणार आहेत.

सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे


मरेवरील 5 स्थानकांवरच्या ब्रिजची सद्यस्थिती

ठाकुर्ली उड्डाणपूल

रेल्वेच्या हद्दीतील काम अंतिम टप्प्यात असून लवकरच पूर्ण होणार. पूर्व दिशेच्या पोहोच रस्त्याचे काम केडीएमसी जानेवारी २०१८ पर्यंत पूर्ण करेल.

कळवा (खारेगाव) उड्डाणपूल

रेल्वेच्या हद्दीतील उड्डाणपुलाचे काम मार्च २०१७ रोजी पूर्ण. उड्डाणपुलाच्या उताराचे काम टीएमसीकडून अजून सुरू झालेले नाही.

दिवा उड्डाणपूल

पुलाचे डिझाईन मंजूर झाले आहे. रेल्वेच्या जागेतील कामाचे बजेट मंजूर झाले आहे. उड्डाणपुलाच्या पोहोच रस्त्याच्या कामाचे बजेट टीएमसीकडून अंतिम झाले नसल्याने काम सुरू झालेले नाही.

शहाड उड्डाणपूल

रेल्वेच्या हद्दीतील पुलाचे काम २०१४ रोजी पूर्ण. पुलाच्या पोहोच रस्त्याच्या कामात केडीएमसीकडून रखडपट्टी

टिटवाळा उड्डाणपूल

पुलाच्या रेल्वेच्या हद्दीतील कामाचे डिझाईन आणि बजेट मंजूर. मात्र, पोहोच रस्त्यासाठी जमिनीचे अधिग्रहण आणि कामाचे बजेट स्थानिक पालिकेकडून अद्याप मंजूर होणे बाकी.हेही वाचा

...म्हणून लष्कर बांधणार एल्फिन्स्टनचा फूटओव्हर ब्रिज


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा