प्रवाशांच्या सोयी सुधारण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून, मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये लवकरच ऑक्सिजन एन्हांसमेंट सिस्टम बसवण्यात येणार आहे. ज्यामुळे जास्त गर्दीमुळे होणारा श्वास घेण्याचा त्रास आणि गुदमरण्याचा त्रास कमी होईल.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी व्हिडिओ लिंकद्वारे या उपक्रमाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, या प्रगत वैशिष्ट्यासह नवीन रेक डिझाइन करण्याचे काम आधीच सुरू आहे.
मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कवर दररोज अंदाजे 75 ते 80 लाख प्रवासी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर अवलंबून असतात. जास्त गर्दीमुळे, हजारो प्रवासी जीव मुठीत घेऊन रेल्वेने प्रवास करतात. कधीकधी ते रेल्वेच्या दारांना लटकत देखील असतात. या गर्दीमुळे लोकल कोचमधील ऑक्सिजनची पातळी कमी होते, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.
"वंदे भारत एक्सप्रेसपासून प्रेरित होऊन नवीन लोकल ट्रेन डिझाइन केल्या जात आहेत. या अपग्रेड केलेल्या ट्रेनमध्ये ऑक्सिजन एन्हांसमेंट सिस्टम असेल, ज्यामुळे लोकल कोचमध्ये हवा खेळती राहिल. वंदे भारत ट्रेनमध्ये बसवलेल्या सिस्टमसारखीच ही सिस्टम डब्यांमध्ये ऑक्सिजनची पातळी राखण्यास मदत करेल," असे वैष्णव म्हणाले.
"यासोबतच वाढत्या प्रवाशांच्या भाराचे व्यवस्थापन करण्यासाठी मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण केले जात आहे. लोकल ट्रेन सेवांची संख्या वाढवण्याचेही प्रयत्न केले जात आहेत. सध्या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर 3,032 लोकल ट्रेन धावतात आणि नजीकच्या भविष्यात ही संख्या 10% वाढण्याची अपेक्षा आहे," असे वैष्णव पुढे म्हणाले.
हेही वाचा