Advertisement

मोनो असुरक्षित! अग्निशमन दलाचे ताशेरे, सुचवल्या शिफारशी

मोठमोठे दावे करत, गाजावाजा करत राज्य सरकार आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)ने मुंबईत मोनोरेल आणली. पण अल्पावधीतच सरकार आणि 'एमएमआरडीए'चे सर्व दावे साफ खोटे ठरले आहेत. ते नुकत्याच लागलेल्या आगीमुळे.

मोनो असुरक्षित! अग्निशमन दलाचे ताशेरे, सुचवल्या शिफारशी
SHARES

आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा, सुरक्षित, सुपरफास्ट प्रवास असे एक ना अनेक मोठमोठे दावे करत, गाजावाजा करत राज्य सरकार आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)ने मुंबईत मोनोरेल आणली. पण अल्पावधीतच सरकार आणि 'एमएमआरडीए'चे सर्व दावे साफ खोटे ठरले आहेत. ते नुकत्याच लागलेल्या आगीमुळे.त्यातही धक्कादायक बाब म्हणजे प्रवाशांसाठी मोनो अजिबात सुरक्षित नाही, हे म्हणणं आहे खुद्द अग्निशमन दलाचं.


अग्निरोधक यंत्रणेची तपासणी

मोनोला ९ नोव्हेंबरला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन दलाने मोनो प्रकल्पातील अग्निरोधक यंत्रणेची तपासणी केली. या तपासणीत मोनोरेल प्रकल्पातील अग्निरोधक यंत्रणा कालबाह्य आणि कुचकामी असल्याचं समोर आल्याची माहिती अग्निशमन दलातील सूत्रांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.


सुचवल्या शिफारशी

त्यानुसार अग्निशमन दलाने 'एमएमआरडीए'ला अनेक महत्त्वाच्या शिफारशी सुचवत या शिफारशींची शक्य तितक्या लवकर आणि योग्य ती अंमलबजावणी करण्यास सांगितलं आहे. यासंबंधी अग्निशमन दलाचे प्रमुख पी. एस. रहांगदळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मोनोतील अग्निरोधक यंत्रणा कालबाह्य झाली असून नव्याने यंत्रणा विकसित करण्यासाठी शिफारशी करण्यात आल्याचे 'मुंबई लाइव्ह'ला सांगत वरील वृत्ताला अप्रत्यक्षरित्या दुजोरा दिला आहे.


यंत्रणा कालबाह्य

मोनो प्रकल्प सेवेत दाखल होऊन ३ वर्षे झाली असली तरी प्रकल्पातील अग्निरोधक यंत्रणाही कित्येक वर्षे जुनी, कालबाह्य असल्याचं अग्निशमन दलाचं म्हणणं आहे. त्यामुळेच ही कुचकामी यंत्रणा ९ नोव्हेंबरला आगीवर नियंत्रण आणू शकली नाही. तर असलेल्या यंत्रणांचा वापर केला जात नसल्याचं, त्याची देखभाल केली जात नसल्याचंही निदर्शनास आलं आहे.


टप्पा-२ साठी अत्याधुनिक यंत्रणा हवी

अग्निशमन दलाच्या या शेऱ्यामुळे मोनो प्रकल्पात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांचा दावा साफ खोटा ठरवला आहे. या धर्तीवर संपूर्ण मोनो प्रकल्पात अर्थात टप्पा-१ आणि लवकरच सुरू होणाऱ्या टप्पा-२ मध्ये अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्याचे सूचना वजा आदेश अग्निशमन दलाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता या शिफारशींची त्वरीत अंमलबजावणी 'एमएमआरडीए'ला करावी लागणार आहे.


'या' आहेत काही शिफारशी

मोनो गाडीसह मोनो प्रकल्पात जिथे जिथे आग लागण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी आॅटो अॅक्टिव्हेटेड डीसीपी अर्थात एक्स्टिग्युशर लावावेत.
आग लागल्यानंतर वा कुठल्याही दुर्घटनेच्यावेळेत मोनो गाडीच्या काचा फोडता वा कापता याव्यात यासाठी विशिष्ट प्रकारचे अत्याधुनिक टुल्स उपलब्ध आहेत. त्या टुल्सचे किटही बंधनकारक.
आग वा इतर दुर्घटनेप्रसंगी मोनो गाडी दोन स्थानकाच्यामध्ये अडकली असेल तर अशावेळी प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी रोपवेसह अन्य अत्याधुनिक यंत्रणा बंधनकारक.


मोनो अधिकाऱ्यांची शाळा

मोनो प्रकल्पातील अग्निरोधक यंत्रणा कालबाह्य आणि कुचकामी असल्याचा शेरा देतानाच अग्निशमन दलाने प्रकल्पातील आपत्कालीन यंत्रणेतील कर्मचारी-अधिकाऱ्यांना प्रशिक्षणाची गरजही व्यक्त केली आहे. त्यानुसार लवकरच कर्मचारी-अधिकाऱ्यांना अग्निशमन दलाकडून प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचंही रहांगदळे यांनी सांगितलं. दरम्यान याविषयी 'एमएमआरडीए'चे अतिरिक्त महानगर आयुक्त संजय खंदारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.



हेही वाचा-

स्कोमीच्या हलगर्जीपणामुळे मोनोला आग! एमएमआरडीए करणार कारवाई

मोनोराणी पुन्हा ट्रॅकवर कधी? कुणालाच माहिती नाही


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा