Advertisement

...अन्यथा सोमवारी टोलनाका बंद पाडू - जितेंद्र आव्हाड


...अन्यथा सोमवारी टोलनाका बंद पाडू - जितेंद्र आव्हाड
SHARES

ठाणे-मुंब्रा बायपास रस्त्याच्या दुरूस्तीचं काम हाती घेण्यात आलं असून पुढचे दोन महिने दुरूस्तीचं काम सुरू असणार आहे. त्यामुळे मुंबई-ठाणे अशी ये-जा करणाऱ्या प्रवाशांना वळसा घालून ऐरोली, शिळफाटा मार्गाचा वापर करावा लागत आहे. त्यात वेळ जात असून वाहतूक कोंडीलाही प्रवाशांना सामोरं जावं लागत आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे प्रवाशांच्या खिशालाही चाट बसत आहे. कारण ऐरोली, मुलुंड टोलनाक्यावरून प्रवाशांना टोल भरावा लागत आहे. त्यामुळे 'दोन महिन्यांसाठी टोल माफ करावा' अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.


सरकारला दिला अल्टिमेटम

दोन महिन्यांसाठी टोल माफ करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारकडे केली आहे. 'जर सोमवारी या दोन्ही टोल नाक्यांवर टोल घेतला, तर टोलनाकाच बंद पाडू', असा इशारा आव्हाडांनी दिला आहे.


प्रवाशांना पडतोय टोलचा भुर्दंड

ठाणे-मुंब्रा बायपास हा मुंबई-ठाण्याला जोडणारा महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्यावरून दररोज ४० हजारांहून अधिक वाहनं धावतात. असं असताना या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. दरम्यान, याआधी दहा वर्षांपूर्वी रस्त्याची दुरूस्ती केली असताना पुन्हा रस्ता धोकादायक झाल्यानं रस्त्याच्या कामाबद्दल, दुरूस्तीच्या कामाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रस्त्याच्या कामाला मंगळवारपासून सुरूवात करण्यात आली असून आता पुढचे दोन महिने हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.


प्रवासी-वाहनचालकांमध्ये नाराजी

मुंब्रा बायपास रस्ता हा टोलमुक्त आहे. मात्र, ऐरोली आणि मुलुंड अशा दोन टोलनाक्यांवर प्रवाशांना टोल भरावा लागत आहे. त्यामुळे प्रवासी-वाहनचालकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड पडत असून त्यांच्यात प्रचंड नाराजी आहे. वाहतूक पोलिसांनी हे पर्यायी मार्ग उपलब्ध करुन दिले असताना टोलचा भुर्दंड का? असा सवाल करत टोल माफ करण्याची मागणी प्रवासी-वाहनचालकांनी उचलून धरली आहे. त्यानुसार आव्हाड यांनी प्रवासी-वाहनचालकांच्या या मागणीला पाठिंबा देत सोमवार पर्यंतचा अल्टिमेटम सरकारला दिला आहे. 'सोमवारी जर टोल बंद झाला नाही, तर टोलनाकाच बंद पाडण्याचा' इशारा त्यांनी दिला आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा