Advertisement

एसटीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज - अनिल परब

कोरोनाच्या संकटांतून बाहेर पडत असताना एसटीला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी उत्पन्न वाढीबरोबरच दैनंदिन खर्चात काटकसर करून, उपलब्ध साधन सामग्रीचा महत्तम वापर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

एसटीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज - अनिल परब
SHARES

कोरोनाच्या संकटांतून बाहेर पडत असताना एसटीला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी उत्पन्न वाढीबरोबरच दैनंदिन खर्चात काटकसर करून, उपलब्ध साधन सामग्रीचा महत्तम वापर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचं प्रतिपादन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी केली आहे.

एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सोबत झालेल्या बैठकीमध्ये अनिल परब यांनी माहिती दिली. कोरोनाच्या पुर्वी दरमहा सुमारे ५० कोटी रुपयांचा तोटा सहन करणाऱ्या एसटीला कोरोनाच्या काळात तब्बल ५ महिने मुंबई महानगर प्रदेशातंर्गत अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यात सेवा बंद ठेवावी लागली. या काळात दररोज सरासरी २२ कोटी रुपये याप्रमाणं तब्बल सुमारे ३ हजार कोटी रुपयांच्या महसूल गमवावा लागला. दुर्दैवाने त्याचा विपरीत परिणाम एसटीच्या आर्थिक स्थितीवर झाला. दरमहा ५० कोटी रुपयांचा तोटा सध्या ३५० कोटी रुपये पर्यंत पोहोचला.

कोरोनाच्या काळात राज्य शासनानं वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार, लाखो मजुरांची वाहतूक, अत्यावश्यक सेवेत काम करणार्‍या डॉक्टर, परिचारिका, पोलीस, शासकीय कर्मचारी, सफाई कामगार अशा कोविड योध्दयांचं सारथ्य, ऊस तोडणी कामगार, परराज्यात असणारे विद्यार्थ्यांची वाहतूक तसंच अत्यावश्यक वस्तूंची मालवाहतूक करण्यासाठी एसटीनं शर्तीचे प्रयत्न केले आहेत.

सध्या शासनाच्या मंजूरी नंतर पूर्ण आसन क्षमतेनं एसटीची वाहतुक सुरू आहे. एसटीचं दैनंदिन उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीनं प्रवासी संख्या वाढविण्याबरोबरच दैनंदिन खर्चात काटकसर करुन, ना नफा ना तोटा पातळीपर्यंत महामंडळाचं आर्थिक उत्पन्न येण्यासाठी प्रत्येकानं सकारात्मक प्रयत्न करणं आवश्यक आहे. यासाठी केवळ प्रवासी तिकिटाच्या महसुलावर अवलंबून न राहता उत्पन्नाचं वेगवेगळं स्त्रोत विकसित करणं, तसंच महामंडळाच्या सर्व संसाधनांचा पुरेपूर वापर करण्याच्या दृष्टीने दैनंदिन व्यवस्थापनामध्ये काटकसर करणं तितकेच महत्त्वाचं आहे.

कृतीशील उपाययोजना तातडीनं राबविण्याचे निर्देश

  • एसटीचा आवर्ती तोटा भरून काढण्यासाठी मालवाहतुक हा सक्षम पर्याय म्हणून पुढे आला आहे.
  • मालवाहतूक व्यवसायाचा विस्तार करण्याच्या दृष्टीनं अधिकाधिक मालवाहू वाहनं तयार करणं गरजेचं आहे.
  • त्यादृष्टीनं भविष्यात सुमारे ३ हजार मालवाहू वाहनं तयार करण्यासाठी प्रयत्न केलं जावं.
  • भविष्यात २५ टक्के शासकीय मालवाहतूक एसटीच्या मालवाहू वाहनाद्वारे करण्याचं नियोजन आहे. त्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केलं जात आहेत.
  • सहाजिकच विस्तारित मालवाहतूकीचं आव्हान पेलण्यासाठी एसटीनं आपली मालवाहतूक यंत्रणा सक्षम करावी.
  • एसटीच्या टायर पुनर: स्थिरीकरण प्रकल्पाचा व्यवसायिक वापर करण्याच्या दृष्टीनं विस्तार करण्यात यावा.
  • इंडियन ऑइल कार्पोरेशनच्या सहकार्यातून, मार्च २०२१ पर्यंत  किमान ५ पेट्रोल/डिझेल पंप सर्व सामान्य जनतेच्या वापरासाठी एसटी महामंडळानं प्रत्यक्ष संचालित करावेत.
  • एसटी महामंडळाच्या प्रत्येक आगार व विभागांना उत्पादित किलोमीटर वर आधारित उत्पन्न वाढवण्याचे उद्दिष्टे देण्यात यावीत. 
  • सदर उद्दिष्टे चांगल्या पद्धतीनं गाठणाऱ्या आगार आणि विभागांना प्रोत्साहनपर बक्षिसं देण्यात यावीत.
  • या बरोबरच योजनेत निकृष्ट कामगिरी करणाऱ्या आगार व विभागातील अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.
  • दिवसागणिक वाढत चाललेला संचित तोटा भरून काढण्यासाठी एसटी महामंडळाच्या विनावापर पडून असलेल्या जमिनीचा कार्यक्षम वापर होण्याच्या उद्देशानं सदर जमीनीवर एसटी महामंडळाचा मालकी हक्क शाबूत ठेवून, निश्चित उत्पन्नाचं स्त्रोत निर्माण करण्याच्या उद्देशानं विविध व्यवसाईक वापराबाबतची पडताळणी करावी.
  • इंधनावरील खर्च कमी करण्याच्या दृष्टीनं २०२३ पर्यंत एसटीच्या सुमारे ३ हजार बसेस लिक्विफाईड नॅचरल गॅस (LNG) इंधनावर रूपांतरित करण्यात याव्यात.
  • भविष्यात एसटी महामंडळमध्ये राबवण्यात येणाऱ्या स्वेच्छानिवृत्ती बाबत पात्र कर्मचाऱ्यांना विचारणा करावी.
  • दैनंदिन प्रवासी तिकीट विक्रीतून सध्या येणारे  १२ कोटी रुपये उत्पन्न दुप्पट म्हणजे २४ कोटी रुपयापर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट निश्चित करताना, प्रवासी संख्या वाढण्याबरोबरच त्यांच्या गरजा ओळखून एसटी महामंडळाच्या प्रवासी वाहतूक सेवेमध्ये गुणात्मक बदल घडवून आणणं अत्यंत गरजेचे आहे.
  • प्रवासीभिमुख योजना राबवण्यावर भर द्यावा.
  • उपरोक्त उपाययोजनांच्या बरोबरच शासनाच्या विविध विभागांकडं सवलतीपोटी प्रलंबित असलेली एसटी महामंडळाची रक्कम तातडीनं मिळवण्यासाठी पाठपुरावा करणं.
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा