१ फेब्रूवारी सोमवारपासून राज्य सरकारनं सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी दिली. नियम व अटी घालून राज्य सरकार व महापालिकेनं रेल्वे प्रवास सुरू केला आहे. त्यामुळं कोरोना प्रतिबंधासाठी ठरवून दिलेल्या नियमांचं पालन न करता लोकल प्रवासासाठी स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांवर स्थानिक महापालिका, नगरपालिकांच्या मदतीने कारवाई करण्यात येणार आहे. तसंच, अशा प्रवाशांना प्रवास करू दिला जाणार नाही. स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढल्यास ती ओसरेपर्यंत स्थानकाची प्रवेशद्वारे बंद करण्यात येणार आहेत.
तब्बल १० महिन्यांनंतर लोकल प्रवासाची मुभा सर्वसामान्यांना मिळाली आहे. त्यामुळं प्रत्येक स्थानकांवर निश्चितच गर्दी वाढणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानकांवरील प्रवाशांची गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. लोकल सेवा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी पोलीस दल सज्ज आहेत.
काय आहेत नियम?
- प्रवेशद्वारांवरून स्थानकात येणारे, लोकलची वाट पाहणारे आणि स्थानकाबाहेर पडणाऱ्या प्रवाशांसाठी मास्कचा वापर बंधनकारक असेल.
- विनामास्क स्थानकावर आलेल्या प्रवाशांवर कारवाई, प्रवासास मनाई.
- कारवाई पोलीस, महापालिका, नगरपालिकांच्या मदतीनं केली जाणार.
- मास्कसह स्थानकात शिरताना, लोकलची वाट पाहाताना प्रवाशांनी अंतर नियम पाळावा यासाठीही उपाययोजना.
- स्थानकाच्या कोणत्याही भागात प्रवाशांची अपेक्षेपेक्षा गर्दी होऊ नये यासाठी बॅरिकेड, दोरीच्या साहाय्याने आखणी.
- सर्वसामान्यांना परवानगी असलेल्या वेळा, करोना नियम, सुरक्षित प्रवासासाठी सूचनेबाबत पोलीस मेगाफोनद्वारे उद्घोषणा.
- प्रत्येक रेल्वे स्थानकात अपेक्षित गर्दीनुसार राज्य रेल्वे पोलीस (जीआरपी), रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ), गृहरक्षक आणि महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे प्रशिक्षित जवान तैनात असतील.
- प्रवाशांचा ओघ पाहून प्रत्येक स्थानकातील किती प्रवेशद्वारे खुली करावी याचा निर्णय घेतला जाईल.
- प्रवेशद्वारावर आणि स्थानकांवर प्रवाशांची जास्त गर्दी झाल्यास ती नियंत्रित ठेवण्यासाठी स्थानिक पोलिसाच्या मदतीनं काही कालावधीसाठी स्थानकांची प्रवेशद्वारे बंद केली जातील.
- स्थानकांवरील गर्दी ओसरताच प्रवेशद्वारावरील प्रवांशांना स्थानकात सोडले जाईल.
- मुभा असलेल्या वेळेत गर्दीनुसार प्रवाशांनाही थोडा संयम पाळावा लागेल.
- गर्दी वाढल्यास, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास स्थानिक पोलिसांच्या मदतीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना केली जाईल.