एसटी महामंडळाने संपकरी कर्मचाऱ्यांचा ३६ दिवसांचा पगार कापण्याचा निर्णय घेतल्याने या कर्मचाऱ्यांच्या पायाखालची वाळूच सरकली होती. मात्र ३६ नव्हे, तर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचा केवळ ४ दिवसांचाच पगार कापण्यात येईल. त्यातही जे कर्मचारी ८ दिवसांची अर्जित रजा समर्पित करतील त्यांची कोणतीही पगारकपात करण्यात येणार नाही, अशी माहिती दिवाकर रावते यांनी मंगळवारी केल्याने या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
संपाच्या कालावधीतील १ दिवसाच्या गैरहजेरीसाठी फक्त १ दिवसाचा पगार दंड म्हणून कपात करण्यात येईल किंवा जे कर्मचारी संपकाळातील ४ दिवसांसाठी ८ दिवसांची अर्जित रजा समर्पित करतील त्यांची कोणतीही पगारकपात करण्यात येणार नाही. परिवहन मंत्री दिवाकर रावते, परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
महामंडळाचा कोणताही कर्मचारी बेकायदेशीर संपावर गेला तर संपाच्या कालावधीतील १ दिवसाच्या गैरहजेरीसाठी १ दिवस विनाकाम - विना वेतन तसेच ८ दिवसांचा पगार दंड म्हणून कपात करण्यात येईल, असा निर्णय एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या २९ जानेवारी २००५ रोजीच्या बैठकीत घेतला होता. त्यानुसार नुकत्याच झालेल्या संपासाठी कर्मचाऱ्यांचं ३६ दिवसांचं वेतन कापण्याचा निर्णय घेण्यात आला होता. एसटी कर्मचारी संघटनांनी यासंदर्भात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतल्याने या दाव्याचा निर्णय लागेपर्यंत ३६ दिवसांचं वेतन कापण्याच्या निर्णयास तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याचं रावते यांनी सांगितलं.
संपकाळात एसटी कर्मचाऱ्यांनी एसटीच्या मालमत्तेचं किंवा वाहनांचं कुठल्याही प्रकारे नुकसान न करता शांततेत संप केला. या सर्व कर्मचाऱ्यांची एसटीवर प्रामाणिक निष्ठा आहे. एसटीसाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांसोबत आम्ही आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा -